Bala Nandgaonkar : मराठी माणसा जागा हो! ही लढाई महाराष्ट्र धर्माची; बाळा नांदगावकरांचे भावनिक पत्र

Published:
मराठी माणसा ही लढाई महाराष्ट्र धर्माची आहे... ही लढाई मराठी माणसाच्या संघर्षाची, स्वाभिमानाची आणि मराठी माणसाच्या अस्तित्वाची आहे. ही लढाई मुंबई वाचवण्यासाठी आहे असं बाळा नांदगावकर यांनी पत्रात म्हटलं.
Bala Nandgaonkar : मराठी माणसा जागा हो! ही लढाई महाराष्ट्र धर्माची; बाळा नांदगावकरांचे भावनिक पत्र

Bala Nandgaonkar : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मराठी जणांना भावनिक पत्र लिहिले आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन बंधू फक्त मराठी माणसासाठी एकत्र आलेत. या दोन्ही भावांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करीन असा शब्द रुग्णालयात बाळासाहेब ठाकरेंना दिला होता, तो पूर्ण केल्याचं मनात समाधान आहे. मराठी माणसा ही लढाई महाराष्ट्र धर्माची आहे… ही लढाई मराठी माणसाच्या संघर्षाची, स्वाभिमानाची आणि मराठी माणसाच्या अस्तित्वाची आहे. ही लढाई मुंबई वाचवण्यासाठी आहे असं बाळा नांदगावकर यांनी पत्रात म्हटलं.

बाळा नांदगावकर यांचे पत्र जसेच्या तसे (Bala Nandgaonkar)

मी आपलाच बाळा

तुमच्यातलाच एक. काल शिवसैनिक, आज महाराष्ट्र सैनिक आणि कायम ठाकरेंचा निष्ठावंत ‘बाळा’.
पक्ष वेगळे असू शकतात, पण रक्तातला रंग एकच, मराठी. हृदयातली ज्वाला एकच, महाराष्ट्र धर्म आणि श्रद्धेचं केंद्र एकच, माननीय शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे. लिलावती रुग्णालयात उपचार घेत असताना साहेबांनी मला सांगितलेले शब्द आजही मला स्पष्ट आठवतात. बाळा, ह्या दोन भावांना एकत्र आण. हे एक झाले पाहिजेत. त्या क्षणी दिलेला शब्द आजही माझ्या काळजात कोरलेला आहे. मी साहेबांना म्हटलं होतं, साहेब, मी प्रयत्न करेन. Bala Nandgaonkar

आज अभिमानाने सांगतो. नियतीने, मराठी माणसाच्या इच्छेने आणि शिवसैनिक-महाराष्ट्र सैनिकांच्या ताकदीने साहेबांना दिलेला तो शब्द पूर्णत्वास गेला आहे. आज ठाकरे बंधू महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी आणि मुंबई वाचवण्यासाठी एकत्र उभे आहेत. ही फक्त राजकीय युती नाही, ही मराठी अस्मितेची गर्जना आहे. ही महाराष्ट्र धर्माची लढाई आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) – राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) – या अभेद्य युतीचे मुंबई महानगरपालिका क्षेत्रात २२७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. मतदान यंत्रावर (EVM) जिथे रेल्वे इंजिन निशाणी असेल तिथे त्यासमोरील बटण दाबून युतीच्या उमेदवाराला प्रचंड बहुमताने निवडून द्या. तर तुमच्या मतदान यंत्रावर (EVM) जिथे मशाल आणि तुतारी ही निवडणूक निशाणी दिसेल तिथे युतीच्या उमेदवाराला निवडून द्या.इतर प्रभागांतील सैनिकांनो – ही तुमचीही जबाबदारी आहे.

ही लढाई मराठी माणसाच्या अस्तित्वाची

ही लढाई मराठी माणसाच्या संघर्षाची, स्वाभिमानाची आणि मराठी माणसाच्या अस्तित्वाची आहे. ही लढाई मुंबई वाचवण्यासाठी आहे. चला – माननीय शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न साकार करूया! माननीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे मराठी माणसांचे आणि समस्त हिंदू समाजाचे हृदयसम्राट. गर्व से कहो हम हिंदू है अशी गर्जना करणारे मा. बाळासाहेब आमचे हृदय आहेत. सन्माननीय उद्धवजी आणि राजजी हे बाळासाहेबांचे दोन डोळे आहेत, तर निष्ठावंत महाराष्ट्र सैनिक आणि कडवट शिवसैनिक हा त्यांचा तिसरा नेत्र आहे. तो नेत्र उघडला की ज्वाळा निघतात, मशाल पेटते आणि ती मशाल आज इंजिनातलं इंधन पेटवून महापालिकेकडे तुतारी फुंकत सुसाट धावत आहे. आज केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशात चमत्कार घडवू शकणारे सन्माननीय श्री. शरद पवार साहेब देखील आपल्या सोबत आहेत. थोडक्यात विकासाचं परिपूर्ण समीकरण जमलं आहे.

म्हणूनच हात जोडून विनंती करतो, मराठी माणसा जागा हो! रात्र वैऱ्याची आहे! मुंबई आपली आहे. मुंबईवर प्रेम करणारा प्रत्येक जाती-धर्माचा माणूस आपलाच आहे. मी महाराष्ट्राचा आहे, महाराष्ट्र माझा आहे. मुंबई माझी आहे. मी मुंबईचा आहे. मी मनसेचा नेता म्हणून नाही, तर तुमचा आपला बाळा म्हणून सांगतो. ही निवडणूक फक्त उमेदवारांची नाही, ही आपल्या अस्मितेची, आपल्या भविष्यातील मुंबईची आणि मराठी माणसाच्या हक्काची आहे. घराघरात जा, गल्लीोगल्ली फिरा, माणसामाणसांत विश्वास जागवा. मत द्या मतदार घडवा आणि युतीचे उमेदवार प्रचंड बहुमतानी विजयी करा.

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews