भारतात विमान वाहतूक क्षेत्रात स्पर्धात्मक वातावरण असणे अत्यंत गरजेचे आहे. स्पर्धेमुळे तिकीट दर कमी होतात, ज्याचा थेट फायदा सामान्य प्रवाशांना होतो. विविध विमान कंपन्यांमुळे अधिक मार्गांवर उड्डाणे सुरू होतात आणि दुर्गम भागांचा देशाच्या मुख्य प्रवाहाशी संपर्क वाढतो. सेवा गुणवत्ता सुधारते, वेळेचे पालन, सुरक्षितता आणि प्रवाशांच्या सुविधांकडे कंपन्या अधिक लक्ष देतात. स्पर्धेमुळे नव्या तंत्रज्ञानाचा वापर, रोजगारनिर्मिती आणि पर्यटन क्षेत्राला चालना मिळते. तसेच देशाच्या आर्थिक विकासाला गती मिळून भारत जागतिक विमान वाहतूक क्षेत्रात अधिक सक्षमपणे पुढे जातो. यादृष्टीने एक महत्वपूर्ण पाऊल खरंतर आता उचलले जात आहे. कारण, भारतामध्ये लवकरच तीन नवीन विमान कंपन्यांची सेवा सुरू होणार आहे.
3 नव्या विमान कंपन्यांची सेवा सुरू होणार
भारतातील विमान प्रवाशांसाठी एक आनंदाची समोर आलीयं. काही दिवसांपूर्वी एअरलाईन इंडिगोचे उड्डाण वेळापत्रक पूर्णपणे कोलमडल्याने एकच गोंधळ उडाला होता. या गोंधळाचा प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. त्यानंतर आता भारतात नवीन 3 विमान कंपन्यांना मंजुरी मिळालीयं. सरकारकडून या तीन नवीन विमान कंपन्यांना एनओसी दिलीयं. भारतात एअर इंडिया, इंडिगो, स्पाइसजेट आणि इतर विमान कंपन्या आधीच कार्यरत आहेत. या यादीत काही नवीन नावे सामील होणार आहेत. शंख एअर, अल हिंद एअर आणि फ्लाय एक्सप्रेस सारख्या विमान कंपन्या भारतीय आकाशात उड्डाण करण्यास सज्ज आहेत.
सरकारकडून विमान कंपन्यांना हिरवा कंदील
यासंदर्भात केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी निवेदन जारी करुन माहिती दिलीयं. मागील आठवड्यात अनेक विमान कंपन्यांच्या टीमशी भेट घेतली. शंख एअर, अल हिंद एअर आणि फ्लाय एक्सप्रेस या 3 नवीन कंपन्यांना सरकारने मंजुरी दिलीयं. डीजीसीएने नवीन विमान कंपन्यांना मान्यता दिली असून राम मोहन नायडू म्हणाले, शंख एअर, एआय हिंद एअर आणि फ्लायएक्सप्रेस या नवीन विमान कंपन्यांची विमाने भारतात सेवा देणार आहेत. शंख एअरला मंत्रालयाकडून आधीच एनओसी मिळाले आहे.
अल हिंद एअर आणि फ्लायएक्सप्रेसलाही या आठवड्यात एनओसी देण्यात आले आहेत. ते म्हणाले की, देशात शक्य तितक्या नवीन विमान कंपन्यांना प्रोत्साहन देणे हे मंत्रालयाचे ध्येय आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्र्यांनी सांगितले की, भारत हा जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या विमान वाहतूक बाजारपेठांपैकी एक आहे. दरम्यान, केंद्र सरकारच्या धोरणांमुळे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे ही वाढ शक्य झाली आहे. उडान योजनेमुळे लहान विमान कंपन्या बळकट झाल्या आहेत. स्टार एअर, इंडियावन एअर आणि फ्लाय 91 सारख्या विमान कंपन्या प्रादेशिक कनेक्टिव्हिटीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. त्यामुळे आगामी काळात भारतीय प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.





