MP Breaking News
Sun, Dec 21, 2025

भगवा दहशतवाद म्हणणाऱ्यांनी माफी मागावी, मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निकालानंतर भाजपाची काँग्रेसवर टीका

Written by:Smita Gangurde
Published:
आरोपींची झालेली निर्दोष मुक्तता हे बघता हिंदू दहशतवाद किंवा भगवा दहशतवाद हे नॅरेटिव्ह बाद झालंय असं म्हणायचं का, असा प्रश्न उपस्थित झालाय.
भगवा दहशतवाद म्हणणाऱ्यांनी माफी मागावी, मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निकालानंतर भाजपाची काँग्रेसवर टीका

मुंबई – 2008 मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञासिंह, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह सात आरोपींची एनआयए कोर्टानं निर्दोष मुक्तता केली आहे. यानंतर भाजपा आणि काँग्रेस नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसतायेत.

यानंतर भगवा दहशतवाद हा शब्दप्रचार रुढ करणाऱ्या आणि नवा नरेटिव्ह सेट करणाऱ्या काँग्रेसनं माफी मागावी अशी मागणी भाजपाच्या सगळ्याच मोठ्या नेत्यांकडून करण्यात येते आहे.

भगवा दहशतवाद कधीही नव्हता आणि असणारही नाही-मुख्यमंत्री

भगवा दहशतवाद कधीच देशात अस्तित्वात नव्हता आणि यापुढेही कधी असणार नाही, अशी प्रतिक्रिया या निकालानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. या निर्णयाचं मुख्यमंत्र्यांनी स्वागत केलंय. तर कोर्टाच्या या निर्णयानं भगवा दहशतवाद सांगणाऱ्यांच्या कानाखाली मारली आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. ज्यावेळी देशात बाँम्बस्फोट होत होते, त्यावेळी हेच काँग्रेसचे नेते दहशतवादाला धर्म नसतो असं सांगत होते आणि नंतर यांनीच भगवा दहशतवाद हा शब्द रुढ केला अशा प्रतिक्रिया उमटतायेत. काँग्रेस, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी भाजपाकडून करण्यात येतेय.

सुप्रीम कोर्टात आव्हान देण्याचं वक्तव्य का नाही- विरोधक

तर या निर्णयाचं स्वागत करणाऱ्या सत्ताधाऱ्यांवर विरोधक टीका करतायेत. काही दिवसांपूर्वी मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींची मुक्तता केल्यानंतर राज्य सरकारनं सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. तर मग मालेगाव प्रकरणातही तोच न्याय लागू व्हायला हवी अशी मागणी करण्यात येतेय. राज्य सरकारची भूमिका वेगवेगळी कशी असू शकते असा प्रश्न निर्माण केलाय.

भगवा दहशतवादाचा इतिहास

2000 च्या दशकात भगवा दहशतवाद हा शब्द प्रचलित झाला होता. देशात बाँम्बस्फोट होत असताना मालेगावपासून काही प्रकरणात हिंदूत्ववादी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांकडून भगवा दहशतवाद हा शब्द रुढ करण्यात आला.

भगवा दहशतवाद संकल्पना कुणाची?

2002 मध्ये गुजरात दंगलीवेळी द फ्रंटलाईन या इंग्रजी नियतकालिकामध्ये सर्वप्रथम उल्लेख झाला. 2008च्या मालेगाव स्फोटाप्रकरणी हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांना अटक झाली. 2010 मध्ये माजी गृहमंत्री पी चिदंबरम यांच्याकडून संसदेच्या सभागृहात सर्वप्रथम या शब्दाचा वापर करण्यात आला. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, दिग्विजय सिंह यांच्याकडून याचा वारंवार उल्लेख झाला. 2013 मध्ये जयपूरमधील काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात सुशीलकुमार शिंदेंकडून जाहीर वापर करण्यात आला.

तत्कालीन सत्ताधारी काँग्रेस पक्षाकडून हिंदू दहशतवाद किंवा भगवा दहशतवाद असा शब्द प्रयोग करण्यात आला. त्यावेळी या संज्ञेचं खूप मोठं भांडवल झालं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि तत्कालीन गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी यूपीए-2 सरकारच्या काळात ‘भगवा दहशतवाद’ या शब्दावरुन टीका केली होती. पण, आता त्यांनी काही महिन्यांपूर्वी यावर स्पष्टीकरण देताना मी तेव्हा हा शब्द वापरायला नको होता असं म्हटलं होतं
पक्षाने भगवा दहशतवाद होत असल्याचे सांगितले होते. त्यामुळेच पक्षाच्या सांगण्यावरुन मी तो शब्द वापरला. मी तेव्हा दहशतवाद हा शब्द वापरला, पण हा शब्द का वापरला, हे मलाही माहीत नाही. असे बोलायला नको होते. तो शब्द चुकीचा होता. ही त्या पक्षाची विचारधारा असते, असं शिंदे नंतर म्हणाले होते.

भगवा दहशतवाद नरेटिव्ह बाद

मालेगाव बॉम्बस्फोटातील सगळे आरोपी निर्दोष असतील, तर यामागे कोण होतं? स्फोट कोणी घडवले? साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना तुरुगांत डांबण्याची हिमंत कोणी केली? पुरोहित नावाचे लष्करी अधिकारी देखील या प्रकरणात आरोपी होते, मग त्यांनाही अडकवण्यात आलं होतं का? त्यात आरोपींची झालेली निर्दोष मुक्तता हे बघता हिंदू दहशतवाद किंवा भगवा दहशतवाद हे नॅरेटिव्ह बाद झालंय असं म्हणायचं का, असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.