राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठी घोषणा केली आहे. सरकारने अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी 31 हजार 628 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केलं आहे. आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपस्थितीत पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी याबाबत घोषणा केली. सरकारच्या या निर्णयामुळे पूरग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कशी मदत मिळणार ?
अतिवृष्टीमुळे ६८ लाख ६९ हजार हेक्टर पिकांचे पूर्ण किंवा अंशतः नुकसान झाले असून, २९ जिल्ह्यांतील २५३ तालुक्यांतील २०५९ ग्रामपंचायतींना सरसकट मदत करण्यात येईल. कोरडवाहू शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 18500 रुपयांची मदत मिळणार आहे, तर हंगामी बागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 27 हजार रुपयांची मदत मिळणार आहे. बागायती शेतीला 32500 रुपयांची मदत केली जाणार आहे. जमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 47 हजार रोख नुकसान भरपाई आणि हेक्टरी 3 लाख नरेगाच्या माध्यमातून देण्यात येईल. त्यामुळे, जवळपास हेक्टरी साडेतीन लाख रुपये मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून धान्य वाटपासारखी तात्काळ मदत सुरू केली असून, १८२९ कोटी रुपये आधीच वितरित झाले आहेत.
जनावरे आणि घरासाठीही मदत
दुधाळ जनावरांना 37 हजार रुपयांपर्यंत मदत
गाळ भरलेल्या विहिरींसाठी 30 हजार
कुकुटपालनाला 100 रुपये प्रति कोंबडी
नष्ट, पडझड झालेली घरं नव्याने बांधण्यासाठी मदत
डोंगरी भागातील घरांना 10 हजारांची अधिकची मदत
झोपड्यांची मदत, गोठा, दुकानदार यांना 50 हजार मदत करणार
विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी करणार
अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांच्या विहिरीचं नुकसान झालं आहे, त्यांच्यासाठी तीस हजार रुपयांची विशेष मदत
इन्फ्राक्ट्रक्चरसाठी दहा हजार कोटींची तरतूद
पावसामुळे ज्यांची घर पूर्ण पणे उद्ध्वस्त झाली आहेत, अशा लोकांना पीएम आवास योजनेंतर्गत नवं घर, तसेच ज्यांच्या घराचं अंशत: नुकसान झालं आहे, त्यांना घर उभारणीसाठी मदत
ज्या शेतकऱ्यांनी पिकांचा विमा काढला आहे, त्यांना नुकसानभरपाईची घोषणा






