वादाच्या भोवऱ्यात अडकलेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्याकडून तूर्तास अभय मिळाले आहे. मंत्रिमंडळ बैठकीआधी मंगळवारी पवार आणि कोकाटे यांची वेगळी बैठक झाली. त्यानंतर हा निर्णय झाल्याची माहिती समोर येत आहे. कोकाटेंनी अजित पवारांकडे दिलगिरी व्यक्त केल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, राजीनामा न घेतल्याने आता विरोधकांकडून मात्र दबाव वाढताना दिसत आहे.

कोकाटेंची वादग्रस्त कृत्य आणि विधाने

कृषिमंत्रिपद मिळाल्यापासून सातत्याने वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आहेत. यातच नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेत मोबाइलवर पत्ते खेळतानाचा त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर कोकाटे यांनी याबाबत स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. परंतु, या नादात त्यांनी सरकार भिकारी असल्याची वादग्रस्त टिप्पणी केली. त्यावर खुद्द मुख्यमंत्र्यांनीही जाहीर नाराजी व्यक्त केली होती.

कोकाटे यांच्याशी बोलून निर्णय घेणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले होते.त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होण्याची अटकळ बांधली जात होती. दरम्यान, मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीआधी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक झाली. त्यामध्येच पवार आणि कोकाटे यांच्यात वेगळी बैठक झाली. या वेळी पवार यांनी कोकाटे यांच्या विधिमंडळातील वर्तनावर स्पष्ट नाराजी व्यक्त केली; तसेच त्यांच्या वक्तव्यांमुळे सरकार अडचणीत येत असल्याचे निक्षून सांगितल्याचे कळते.

कोकाटेंना अभय, राजीनाम्यासाठी दबाव!

कोकाटेंनी अभय दिल्याने त्यांच्या राजीनाम्यासाठी मात्र दबाव वाढताना दिसत आहे. ‘राज्याचे कृषिमंत्री शेतकऱ्यांविरोधात विधान करतात. विधिमंडळात कामकाज सुरू असताना मोबाइलवर पत्ते खेळतात. मात्र सरकार या बेजबाबदार मंत्र्यांचा राजीनामा घेत नाही. कृषिमंत्री कोकाटे यांचा राजीनामा न घेणे हा सरकारचा शेतकऱ्यांप्रतिचा असंनवेदनशीलपणा आहे,’ अशी टीका काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत केली. त्यामुळे विरोधकांच्या वाढत्या दबावानंतर या प्रकरणात पुढे आणखी काही घडत हे पाहणे महत्वाचे ठऱणार आहे.