Ajit Pawar Death : दादांचा कार्यकर्त्यांना तो सल्ला ठरला शेवटचा, म्हणाले, राजकारण लय वंगाळ, त्यात पडू नका 

Published:
काही दिवसांपूर्वीच अजित पवारांनी चाकण येथील एका भाषणावेळी लोकांना सल्ला दिला होता. “राजकारण लय वंगाळ आहे. जमिनीचे पैसे आले असतील तर राजकारणात पडू नका. धंदा-पाणी करा, मस्तपैकी राहा, मुलाबाळांना चांगलं शिकवा आणि निर्व्यसनी जीवन जगा
Ajit Pawar Death : दादांचा कार्यकर्त्यांना तो सल्ला ठरला शेवटचा, म्हणाले, राजकारण लय वंगाळ, त्यात पडू नका 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झालं आहे. आज सकाळी बारामतीत लँडिंग दरम्यान हा भीषण अपघात झाला. या अपघातात अजित पवार यांच्यासह ६ जणांचा मृत्यू झाला आहे. कालपर्यंत राजकारणात सक्रीय असणारे अजित पवार आज सकाळी या जगात नाहीत यावर कुणाचा विश्वास बसत नाही. दादांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. अजित पवारांचे किस्से आणि जुन्या आठवणींना आज उजाळा मिळत आहे. त्यातीलच एक किस्सा म्हणजे अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिलेला कानमंत्र…

काय म्हणाले होते अजित पवार

काही दिवसांपूर्वीच अजित पवारांनी चाकण येथील एका भाषणावेळी लोकांना सल्ला दिला होता. “राजकारण लय वंगाळ आहे. जमिनीचे पैसे आले असतील तर राजकारणात पडू नका. धंदा-पाणी करा, मस्तपैकी राहा, मुलाबाळांना चांगलं शिकवा आणि निर्व्यसनी जीवन जगा. काहींना जमिनीचे पैसे आले की लगेच राजकारणात उडी घ्यायची हौस होते. बायकोला उभं करा, तू निवडणूक लढ..असं करू नका. पैसे संपले की काय करणार? दोन हाताला चुना लावून ‘ठो-ठो’ करणार? त्याचा काहीच उपयोग नाही, साधुसंतांनीही आपल्याला तेच सांगितले असा कानमंत्र अजित पवारांनी दिला होता. दादांचा तो शेवटचा सल्ला ठरला.

अजित पवार हे नाव म्हणजे जबाबदारी

दरम्यान, अजित पवार हे नाव म्हणजे जबाबदारी, वेळेचं भान आणि कामासाठीचा हट्ट. पहाटेच अचानक बसस्थानकात उभं राहून व्यवस्था पाहणारा नेता… रस्त्यांची, सार्वजनिक जागांची प्रत्यक्ष पाहणी करणारा मंत्री… चांगलं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची पाठीवर हात ठेवून प्रशंसा करणारा, आणि कामात ढिलाई असेल तर न जुमानता बोल लावणारा कणखर व्यक्तिमत्त्व. त्यामुळेच ते जनतेमध्ये ‘दादा’ म्हणून प्रेम आणि आदराने ओळखले जात. आज त्यांचा दिवसाचा कार्यक्रमही तितकाच धावपळीचा होता. बारामती तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या चार महत्त्वाच्या सभा, स्थानिक नेत्यांशी संवाद, पावसामुळे नुकसानीचा आढावा… कामाच्या या फेरित त्यांना विश्रांती ही शब्दशः माहीतच नव्हती. पण नियतीने अचानक हा वेग थांबवला आणि एक धडाडीचा नेता आपल्या कार्यातूनच नव्हे तर जगातूनही दूर गेला.

राजकारणात अनेक वर्षे विविध महत्त्वाची पदे सांभाळताना अजित पवार यांनी अनेक कठोर निर्णय घेतले. कित्येक वेळा विरोधकांनी टीका केली, तर अनेकदा जनतेने त्यांच्याकडे विश्वासाने पाहिलं. प्रशासनात त्यांची पकड इतकी मजबूत होती की एखाद्या जिल्ह्यात त्यांच्या भेटीची बातमी आली की अधिकारी सतर्क व्हायचे—कारण दादा येतात म्हणजे कामात कुठलीही ढिलाई चालत नाही. त्यांचे अचानक जाणे केवळ पवार कुटुंबासाठी नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी मोठा धक्का आहे. राजकीय वर्तुळ शोकसागरात बुडाले आहे. कार्यकर्त्यांना धीर धरणे कठीण जात आहे, कारण त्यांना त्यांचा नेता, मार्गदर्शक, आणि प्रेरणादायी व्यक्ती गमवावी लागली आहे.