Ajit Pawar Plane Crash : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत समोर आलेल्या विमान अपघाताच्या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात शोक आणि संभ्रमाचे वातावरण आहे. ही घटना अपघात होती की त्यामागे काही वेगळे कारण होते, असा गंभीर सवाल आता राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे. विरोधी पक्षातील नेत्यांनी या प्रकरणात संशय व्यक्त करत सखोल आणि निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी या घटनेबाबत घातपाताची शक्यता असल्याचा दावा केला आहे. विशेषतः अमोल मिटकरी यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना केलेल्या विधानांमुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.
CCTV फुटेजवरून संशय (Ajit Pawar Plane Crash)
अमोल मिटकरी म्हणाले, “२८ तारखेला सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी मुंबईतील कलिना विमानतळावरून खासगी विमान उड्डाण करत असताना गेट क्रमांक ८ वर अजित पवार यांचे CCTV फुटेज दिसत नाही. त्यांच्या सोबत असलेले OSD देखील फुटेजमध्ये आढळत नाहीत. त्यामुळे मला या संपूर्ण घटनेत घातपाताचा संशय वाटतो.”बारामतीत धुके असल्यामुळे अपघात झाल्याचे कारण दिले जात असताना, “मग अशा परिस्थितीत विमानाचे लँडिंग पुण्यात का करण्यात आले नाही?” असा सवाल उपस्थित करत, या घटनेची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली. Ajit Pawar Plane Crash
संजय राऊतांचे गंभीर प्रश्न
दरम्यान, खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणावरून अनेक खळबळजनक प्रश्न उपस्थित केले आहेत. “अजित पवार वारंवार सांगत होते की भाजपच्या भ्रष्टाचारासंदर्भातील फाईल त्यांच्या जवळ आहे आणि ती ते उघड करणार आहेत. १५ जानेवारी रोजी त्यांनी यावर सार्वजनिक भाष्य केले आणि काही दिवसांतच ही घटना घडली. हे सगळे अत्यंत रहस्यमय आहे,” असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. “जर विमानात सहा प्रवासी होते, तर फक्त पाच मृतदेह कसे सापडले? सहावी व्यक्ती कोण होती आणि तिचा मृतदेह का मिळाला नाही?” तसेच, “एकीकडे मृतदेह ओळखू येण्यास अडचण असल्याचे सांगितले जाते, मात्र अजित पवारांकडे असलेले कागद जळालेले नाहीत. त्या कागदांमध्ये भ्रष्टाचारासंबंधी फाईल होती का?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
या सर्व दाव्यांमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, विरोधकांकडून निष्पक्ष चौकशीची जोरदार मागणी होत आहे. मात्र या आरोपांवर अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका किंवा स्पष्ट स्पष्टीकरण समोर आलेले नाही. त्यामुळे सत्य काय, हे सखोल तपासणीनंतरच स्पष्ट होणार आहे.





