‘2026 ची आषाढी पूजा अजित दादाच करणार’, अमोल मिटकरींचं देवाला साकडं

Written by:Rohit Shinde
Published:
अमोल मिटकरी यांनी पालखीत रूपनाथ महाराज आणि विठ्ठलाकडे साकडं घालतांना अजितदादांना लवकरच राज्याचे मुख्यमंत्री करा, असे साकडे घातले.
‘2026 ची आषाढी पूजा अजित दादाच करणार’, अमोल मिटकरींचं देवाला साकडं

अजित पवार यांची मुख्यमंत्रीपदाची अपेक्षा ही नवीन नाही, तर ती अनेक वर्षांपासून सुरु आहे. उपमुख्यमंत्रीपदावर अनेक वेळा कार्य केल्यानंतरही, त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालेले नाही. त्यांच्या समर्थकांमध्येही या पदाबाबत अपेक्षा सातत्याने दिसून आली आहे. अलीकडील घडामोडींमध्ये त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या संभाव्यतेवर पुन्हा चर्चा रंगल्या आहेत. भाजपसोबत युतीनंतर अजित पवार यांच्या राजकीय वजनात वाढ झाली असली तरी, मुख्यमंत्रीपद अद्याप त्यांच्या हातात आलेले नाही. अनेकदा त्यांनी ही इच्छा थेट न बोलता सूचक पद्धतीने व्यक्त केली आहे. त्यात आता अमोल मिटकरींमुळे पुन्हा एकदा हा मुद्दा चर्चेत आला आहे,

दादा मुख्यमंत्री व्हावेत, मिटकरींचं विठ्ठलाला साकडं

पुढच्या आषाढी एकादशीला पंढरपूरच्या पांडुरंगाची शासकीय महापूजा मुख्यमंत्री म्हणून अजित पवार  यांनी सपत्नीक करावी, असं विठ्ठलाला साकडं घातल्याची प्रतिक्रिया अमोल मिटकरी यांनी दिली आहे.  अमोल मिटकरी यांच्या अकोल्यातील आरोग्यनगर भागातील निवासस्थानी रूपनाथ महाराजांची पालखी आली होती. यावेळी अमोल मिटकरी यांनी पालखीत रूपनाथ महाराज आणि विठ्ठलाकडे साकडं घालतांना अजितदादांना लवकरच राज्याचे  मुख्यमंत्री करा, असे साकडे घातले.

काय म्हणाले अमोल मिटकरी?

मी पांडुरंगाच्या चरणी एकदाच साकडे घातले होते. आज पालखीचे प्रस्थान होत आहे. ज्ञानोबारायांची पालखी आळंदीवरून निघाली आहे. काल तुकोबारायांची पालखी निघाली. आता आमच्या जिल्ह्यातील पालखी निघत आहेत. या पालखीची आरती करताना आम्ही एकच साकडे घातले की, यावर्षी पांडुरंगाच्या मनात नसेल. पण पुढच्या आषाढी एकादशीची शासकीय महापूजा ही राज्याचे सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री म्हणून सपत्नीक करावी, हे साकडे मी पांडुरंगाला घातले आहे, असे मिटकरी म्हणाले.

मिटकरींनी यापूर्वीही इच्छा बोलून दाखवली होती. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दहाव्यांदा राज्याचा अर्थसंकल्प मांडला आहे. त्यामध्ये महिलांसाठी ई -पिंक रिक्षा योजना आहे. मोफत शिक्षणाची सुविधा आहे. शेतकऱ्यांना मोफत विजबील आहे आणि सर्वात महत्वाची लाडकी बहिण योजना राबवण्यात आली आहे. याच योजनेच्या भरोशावर 2024 ची विधानसभा निवडणूक जिंकून अजितदादा पुढच्यावर्षी मुख्यमंत्री होतील आणि बाप्पाची पूजा करतील, असे त्यांनी म्हटले होते.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews