मुख्यमंत्र्यांनी फटकारल्यानंतर उतरला माज, बबनराव लोणीकरांनी मागितली वादग्रस्त वक्तव्यावर माफी

Written by:Smita Gangurde
Published:
मुख्यमंत्र्यांनी समज दिल्यानंतर बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांची माफी मागितली आहे. अंगात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत शेतकऱ्यांविरोधात काहीही बोलणार नाही, असं बबनराव लोणीकर म्हणाले आहेत.
मुख्यमंत्र्यांनी फटकारल्यानंतर उतरला माज, बबनराव लोणीकरांनी मागितली वादग्रस्त वक्तव्यावर माफी

मुंबई- अनेकांच्या आयांचे पगार, बापाला शेतीत पेरणीसाआठी सहा हजार बबनराव लोणीकरनं दिले आणि यांची लेकरं कट्ट्यावर बसून आमच्यावर तंगड्या वर करतात, अशा आशयाचं वादग्रस्त विधान भाजपा आमदार, माजी मंत्री बबनराव लोणीकरांना चांगलंच महागात पडलंय. लोणीकर यांच्यावर झालेल्या टीकेनंतर मुख्यमंत्र्यांनीही या वक्तव्याचा निषेध करत, लोणीकरांना योग्य समज देण्यात येईल असं सांगितलं होतं.

मुख्यमंत्र्यांनी समज दिल्यानंतर बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांची माफी मागितली आहे. अंगात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत शेतकऱ्यांविरोधात काहीही बोलणार नाही, असं बबनराव लोणीकर म्हणाले आहेत.

लोणीकरांचं वादग्रस्त वक्तव्य नेमकं काय?

एका कार्यक्रमात माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी ट्रोलर्सवर जोरदार टीका केली होती.

ते कुचवट्यावर बसलेले पाच-सहा कारटे… त्याच्या मायचा पगार बबनराव लोणीकरने केला. त्याच्या बापाला पेरणीसाठी 6 हजार रुपये पंतप्रधान मोदी यांनी दिले. तुझ्या मायच्या, तुझ्या बहिणीच्या, बायकोच्या नावावर लाडकी बहीण योजनेचे पैसे आले. तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारने दिले. तुझ्या पायातील बूट आणि चप्पल आमच्यामुळेच आहेत. तुझ्या हातातले मोबाइलचं डबडं देखील आमच्यामुळेच आहे. आमचेच पैसे घेतो आणि आमच्याच तंगड्या वर करतो. आमचेच घेतो आणि आम्हालाच बोलतो, चुकीचं लिहितो

असं बबनराव लोणीकर म्हणाले होते. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.

विरोधकांचं आणि सत्ताधाऱ्यांनीही फटकारलं

विरोधकांनी लोणीकर यांच्या या वक्तव्यावर टीका केली होती. लोणीकर यांना मिळालेली आमदारकी, विमानाचा प्रवास हेही जनतेचे आहे, या शब्दांत अंबादास दानवे यांनी एक्स पोस्ट करत लोणीकरांना खडे बोल सुनावले होते. या राज्यातली जनता स्वाभिमानी आहे, लाचार नाही, हे लोणीकरांनी समजून घ्यायला पाहिजे अशी टीका संजय राऊत यांनी केलीय. तर प्रचंड पैसा आणि प्रचंड सत्तेतून असं विधान येतं अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली होती. यानंतर सत्ताधारी मुख्यमंत्री आणि चंद्रशेखर बावनकुळेंनी लोणीकरांचे कान टोचले होते. सत्तेत असलो तरी आपण मालक नाही तर सेवक आहोत ही जाणीव लोणीकरांना करुन देण्यात आली.

बबनराव लोणीकर हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे यापूर्वीही चर्चेत आले आहेत. ३५ वर्षे राजकारण करणाऱ्या बबनराव लोणीकरांच्या या वक्तव्यानं ते पुन्हा एकदा अडचणीत आल्याचं मानण्यात येतंय.