मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा बांधव मुंबईमध्ये एकवटले आहेत. मुंबईमध्ये भगव वादळ आलं आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं ही मराठा बांधव आणि मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे. जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत आता माघार घेणार नाही अशी भूमिका मराठा समाजाची आहे. त्यामध्ये आता मुंबईत सरकारी पातळीवर अनेक मोठ्या घडामोडी आता घडताना दिसत आहे. सरकारने जरांगेंची एक मोठी मागणी मान्य देखील केली आहे. त्यामुळे आणखी काय घटना घडतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
वंशावळ समितीला जवळपास वर्षभराची मुदतवाढ
राज्यातील मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी तालुकास्तरावर तहसिलदारांच्या अध्यक्षतेखाली गठीत वंशावळ समितीस शासनाने दि. ३० जून २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने निर्गमित केला असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिली आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या २५ जानेवारी २०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये ही समिती गठीत करण्यात आली होती. या समितीच्या कार्यकाळाला यापूर्वी ३० जून २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर, माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीचा कार्यकाळ ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढविण्यात आला होता. वंशावळ समितीस मुदतवाढ दिल्याने मोठा फायदा समाजाला होणार आहे.
मुंबईत सरकारच्या हालचाली; बैठकांचे सत्र सुरू
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. मराठा आरक्षण उप समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या रॉयल स्टोन बंगल्यावर मराठा आरक्षण उपसमितीची थोड्याच वेळात बैठक होणार आहे, या बैठकीसाठी उपसमितीचे सदस्य दादा भुसे, माणिकराव कोकाटे, गिरीश महाजन यांच्यासह इतर सदस्य दाखल होण्यास सुरुवात झाली आहे, काही महत्त्वाचे प्रशासकीय अधिकारी देखील विखे पाटील यांच्या बंगल्यावर पोहोचले आहेत. थोड्याच वेळात ही बैठक होणार आहे, या बैठकीनंतर सदस्य जरांगे पाटील यांची भेट घेणार का? बैठकीमध्ये नेमके काय निर्णय घेणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
त्यामुळे जरांगेंच्या आंदोलनाच्या वाढत्या दबावामुळे आता खऱ्या अर्थाने मुंबईत हालचालींना वेग आला आहे. यानिमित्ताने सरकारचे एखादे शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीला येते का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.





