याच आठवड्यात ठरणार भाजपचे 78 जिल्हाध्यक्ष, नावे प्रदेशाध्यक्षांकडे पाठवली

Written by:Arundhati Gadale
Published:
जिल्हाध्यक्षांची निवड करताना जाती समीकरणांचे संतुलन राखत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिला जिल्हाध्यक्षांची निवड करणे हे भाजपसमोर आव्हान असणार आहे.
याच आठवड्यात ठरणार भाजपचे 78 जिल्हाध्यक्ष, नावे प्रदेशाध्यक्षांकडे पाठवली

मुंबई :  भाजपने संघटनात्मक बांधणीकडे बारकाईने लक्ष दिलेले आहे. त्याच दृष्टिकोनातून भाजपने नवीन जिल्हाध्यक्ष नेमण्याची प्रक्रिया सुरू केली होती. विशेष म्हणजे थेट पक्षश्रेष्ठींकडून नाव न जाहीर करता त्या त्या जिल्ह्यातील आमदार,पदाधिकारी, जुने कार्यकर्ते यांच्याची चर्चा करून तुम्हाला कोण जिल्हाध्यक्ष हवा आहे याची विचारणा करण्यात आली. त्यानूसार तीन नावे निश्चित करण्यात आली.

ज्या तीन नावांना पसंती मिळाली आहे ती नावे बंद पाकीटातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पाठवण्यात आली आहेत. त्यामुळे मुंबईत याच आठवठ्यात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्यध्यक्ष रवींद्र वायकर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक होऊन जिल्हाध्यक्षांची नावे निश्चित केली जातील.

जिल्हाध्यक्षपदासाठी काय असेल निकष?

भाजपकडून अधिच तालुकाअध्यक्षांची निवड करण्यात आली आहे. ती निवड करताना 35 ते 45 वयोगटातील नेत्यांना प्रामुख्याने संधी देण्यात आली. त्याचनुसार जिल्हाध्यक्षपदाची निवड करताना 45 ते 60 वयोगटातील नेत्यांना प्रथमसंधी मिळण्याची शक्यता आहे. जिल्ह्यानूसार जात प्रतिनिधित्वाकडे देखील लक्ष दिले जाईल.

अनुसूचित जाती-जमातींना संधी

जिल्हाध्यक्षांची निवड करताना जाती समीकरणांचे संतुलन राखत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिला जिल्हाध्यक्षांची निवड करणे हे भाजपसमोर आव्हान असणार आहे. मात्र, अनुसूचित जाती, जमाती आणि महिला जिल्हाध्यक्षांना 30 टक्क्यांपर्यंत संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर लक्ष

भाजपची पक्षसंघटना बांधणी मजबूत होत असताना काँग्रेसला आणखी दुर्बल करण्याचा भाजपची रणनीती आहे. या रणनीतीनुसार प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजप पदाधिकाऱ्यांसमोर बोलताना काँग्रेस फोडण्याच्या सूचना केल्या. काँग्रेसमधील कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना भाजपमध्ये आणण्याच्या सूचना त्यांनी केल्या. असे करत असताना भाजप कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही, असे आश्वासन देखील त्यांनी दिले.

Follow Us :GoogleNews