Mumbai Municipal Corporation Election:   मुंबई महानगरपालिकेची गेल्या अनेक दिवसांपासून रणधुमाळी सुरु होती. आज १५ जानेवारी रोजी मतदानाला सुरुवात झाली आहे. सकाळी सात वाजल्यापासून नागरिक मतदानाचा हक्क बजावत आहेत. प्रचारापासून आता मतदानापर्यंत विविध खबळजनक प्रकार समोर येत आहेत. आज मुंबईत मतदानानंतर काही मतदान केंद्रावर बोटांवरील शाई लगेच पुसत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

निवडणुकांच्या रणधुमाळीत विरोधी पक्षाकडून निवडणूक आयोगावर सतत गंभीर आरोप केले जात आहेत. यातच आता एक खळबळजनक प्रकार समोर आल्याने निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवर पुन्हा प्रश्न उपस्थित होत आहे. मुंबईतील मतदान केंद्रावर मत टाकल्यानंतर शाई वापरण्याऐवजी मार्करचा वापर केला जात आहे. त्यामुळे बोटांवरील शाई लगेचच पुसून जात आहे. त्यामुळे सर्वत्रच खळबळ उडाली आहे.

दरम्यान मुंबई महानगपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनीसुद्धा मतदानानंतर बोटांवरील शाई पुसली जात असल्याचं स्पष्ट केलं आहे. याआधी कोल्हापुरातील कर्मवीर इंग्लिश मिडीयममध्येसुद्धा असाच प्रकार समोर आला आहे. त्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत.

शाई वापरण्याऐवजी मार्करचा वापर-

या सर्व बाबतीत महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट करत सांगितले आहे की, यंदाच्या निवडणुकीत निवडणूक आयोगाने शाईऐवजी मार्करचे किट उपलब्ध केले आहेत. इतकेच नव्हे तर निवडणूक आयोगाने २०१२ पासून हेच मार्कर प्रत्येक स्थानिक संस्थेच्या मतदानासाठी वापरण्यात येत असल्याचे सांगितले आहे.

माध्यम प्रतिनिधींना निवडणूक केंद्रात मनाई-

यंदाच्या निवडणुकीत निवडणूक आयोगाने अनेक निर्णय घेत सर्वांनाच चकित केलं आहे. यानुसार आज मतदानाच्या दिवशी माध्यमांच्या प्रतिनिधींना निवडणूक केंद्रात आत जाण्याची मनाई केली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)