Congress Vanchit Alliance : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी सोबतची युती जाहीर केली आहे. मागील काही दिवसांपासून दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपाच्या चर्चा सुरू होत्या, अखेर आज दोन्ही पक्षांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत आघाडीची घोषणा केली. मुंबईत वंचित बहुजन आघाडीला काँग्रेसने 62 जागा दिल्या आहेत.
काँग्रेस- वंचितमध्ये चांगलं नातं (Congress Vanchit Alliance)
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र लढणार आहेत. काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी या दोन्ही पक्षांची नैसर्गिक मैत्री आहे. कारण संविधानाला अभिप्रेत असणारा भारत घडवणं हा आमचा देखील राजकीय अजेंडा आहे आणि वंचित बहुजन आघाडीचा देखील हाच राजकीय अजेंडा आहे. काँग्रेस आणि वंचितमध्ये चांगलं नातं आहे. आमची आघाडी विचाराची आहे. सत्तेसाठी आमची आघाडी नाही. जागांपेक्षा विचारांना आम्ही प्राधान्य देत आहोत. हा संख्येचा खेळ आणि विचारांचा मेळ आहे. आमची आघाडी विचारांची आहे, सत्तेसाठी नाही. आजपासून आम्ही दोन मित्रपक्ष आहोत. Congress Vanchit Alliance
काँग्रेसचा आकडा गुलदस्त्यात
वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुंडकर म्हणाले की, भारतीय जनता पार्टीला रोखण्यासाठी आम्ही काँग्रेस सोबत आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रकाश आंबेडकरांनी ऑनलाइन बैठकीत युतीला मान्यता दिली आहे. 227 पैकी 62 जागांवर आम्ही निवडणूक लढवणार आहोत, अशी माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. तर दुसरीकडे काँग्रेस मुंबई महापालिकेत किती जागा लढवणार याबाबतचा आकडा अजून समोर आलेला नाही. मुंबई महापालिकेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटांमध्ये चर्चा सुरू असल्याचे बोलले जाते . या चर्चेनंतरच काँग्रेसचा आकडा जाहीर करण्यात येईल अशी शक्यता आहे





