वादग्रस्त विधाने आणि रम्मीचा डाव खेळणे माणिकराव कोकाटेंना चांगलेच महागात पडले आहे. वादग्रस्त विधानं करणाऱ्या माणिकराव कोकाटेंकडून अखेर कृषि खात काढून घेण्यात आले आहे. दत्तात्रय भरणेंना राज्याचे नवे कृषिमंत्री म्हणून पदभार देण्यात आला आहे. तर, राजीनामा न घेता कोकाटेंना क्रीडा व युवक कल्याण विभागाचा पदभार देण्यात आला आहे. यामुळे वादग्रस्त वागणाऱ्या मंत्री आणि आमदारांना मात्र या निमित्ताने चांगलीच चपराक बसली आहे.
दत्ता भरणे राज्याचे कृषिमंत्री
ज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. या बैठकीत कोकाटेंकडील कृषिखातं काढून घेण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर रात्री उशिरा कोकाटेंचा राजीनामा न घेता त्यांच्याकडील कृषिखात काढून घेत त्यांना दत्ता भरणेंकडील खात्याचे मंत्री बनवण्यात आले आहे. याबाबतची शासन अधिसूचनादेखील जारी करण्यात आली आहे. तर माणिकराव कोकाटेंना क्रिडा आणि युवक कल्याणची जबाबदारी पाहावी लागणार आहे.
दत्तात्रय भरणे यांनी सूचक विधान करत कृषि खातं त्यांच्याकडे येणार असल्याचे संकेत दिले होते. “कृषी खात्याच्या संदर्भात मला अजून तरी काहीही माहिती नाही. मात्र, बारामतीकर न मागता सगळं देतात.” यावरून दत्ता भरणेंना आपल्याला कृषिमंत्रीपद मिळणार, हे आधीच माहिती असल्याची माहिती समोर येत आहे.
मुख्यमंत्री फडणवीसांची नाराजी
दोन दिवसांपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मंत्र्यांना धारेवर धरत त्यांचे कान टोचले होते. यात फडणवीसांनी मंत्र्यांना वादग्रस्त विधानं, कृती अजिबात खपून घेतली जाणार नाही, असे प्रकार होत राहिले तर, सरकारी प्रचंड बदनामी होते. त्यामुळे ही अखेरची संधी, काय कारवाई ती करूचं असेही फडणवीसांनी सांगितले. देवेंद्र फडणवीसांना त्यानुसार कृती केल्याचे सांगण्यात येत आहे.
कोकाटेंच्या अडचणी वाढणार?
1995 साली कागदपत्रं फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप केल्याप्रकरणी राज्याचे माजी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने 50 हजारांच्या दंडासह दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर 24 फेब्रुवारी रोजी सत्र न्यायालयाने सरकारी वकील आणि कोकाटेंच्या वकिलांची बाजू ऐकून घेत या शिक्षेला स्थगिती देत निकाल राखून ठेवत 1 मार्च ही तारीख दिली होती. पण सत्र न्यायालयाने ही सुनावणी आता 5 मार्चला ठेवली आहे.त्यामुळे कोकाटेंच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.





