एकनाथ शिंदे यांच्या काळातील अनेक योजनांना विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ब्रेक लावल्याच्या चर्चा अधून मधून सुरु असतात. काही दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदे यांची आनंदाची शिधा योजना फडणवीस यांनी बंद केल्याची चर्चा सुरु होती. आता यात आणखी एका योजनेची भर पडली आहे. एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळातील ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ योजनेवरही देवेंद्र फडणवीस यांच्याकडून लाल शेरा मारण्यात आला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी ट्विट करत हा दावा केला आहे. एवढच नव्हे तर आणखी कोणकोणत्या योजनांवर फुली मारण्यात आली आहे याची यादीच अंबादास दानवे यांनी ट्विट केली आहे.
काय म्हणाले अंबादास दानवे ?
सामान्यांना कणभर लाभाची अपेक्षा असलेल्या योजना बंद करून देवेंद्र फडणवीस सरकारने आपल्याच सहकाऱ्यांच्या निर्णयांवर फुल्या मारल्या आहेत. अमच्यातून गेलेले ‘कटप्रमुख’ मात्र यावर शब्द न बोलता महाशक्तीच्या लाडक्या बुलेट ट्रेनची री ओढताना आपल्याला दिसतील, असं अंबादास दानवेंनी म्हटलं आहे.
१. आनंदाचा शिधा- बंद!
२. माझी सुंदर शाळा – बंद!
३. १ रुपयात पीकविमा – बंद!
४. स्वच्छता मॉनिटर – बंद!
५. १ राज्य १ गणवेश – बंद!
६. लाडक्या भावाला अपरेंटीसशिप – बंद!
७. योजनादूत योजना – बंद!
८. मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना – बंद!
योजना बंद करणारे हे चालू सरकार आहे. निवडणुकांपुरत्या या सगळ्या योजनांचा भंपकपणा जनतेपुढे निश्चित मांडू, असं अंबादास दानवे म्हणाले.
काय होती योजना ?
‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा हि महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने सुरू केलेली योजना राज्यातील शाळांचा सर्वांगीण विकास, आधुनिकीकरण, सौंदर्यीकरण आणि स्पर्धात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी आहे. ही योजना शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर व्यवस्थापनाच्या शाळांसाठी राबवली जाते. योजनेचा मुख्य उद्देश शाळांना तंत्रज्ञानस्नेही, स्वच्छ आणि आकर्षक बनवणे, विद्यार्थी-शिक्षक सहभाग वाढवणे आणि शाळा सुधारणेसाठी प्रोत्साहन देण्याचा होता. राज्य स्तरावर पहिल्या येणाऱ्या शाळेला 51 लाखांचं बक्षीस दिलं जायचं.






