Dhananjay Munde : एकीकडे सदनिका घोटाळा प्रकरणातील शिक्षा सत्र न्यायालयानं कायम ठेवल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते माणिकराव कोकाटे यांचे मंत्रीपद धोक्यात आले आहे. तर दुसरीकडे धनंजय मुंडे यांनी अचूक टाइमिंग सादर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली. शहा- मुंडे भेटीनंतर लवकरच धनंजय मुंडे राज्य मंत्रिमंडळात दिसू शकतात अशा चर्चांना उधाण आले आहे. याच दरम्यान करुणा मुंडे यांनी मोठा गौप्यस्फोट करत महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. धनंजय मुंडे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील असे विधान करुणा मुंडे यांनी केलं.
वाल्मीक कराडमुळे धनुभाऊ अडचणीत (Dhananjay Munde)
अमित शहा धनंजय मुंडे यांच्या भेटीनंतर करुणा मुंडे म्हणाल्या, धनंजय मुंडे यांच्यावर सध्या अनेक आरोप आहेत. वाल्मीक कराड प्रकरणामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. वाल्मीक कराड याला या संपूर्ण प्रकरणातून बाहेर काढण्यासाठी आणि सुटका करून घेण्यासाठी धनंजय मुंडे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील. त्यासाठी हालचाली सुरू झालेल्या आहेत, त्यामुळे धनंजय मुंडे हे दिल्लीला गेले असल्याचा खुलासा करुणा मुंडे यांनी केला आहे. करुणा मुंडे यांचे भाकीत खरं ठरलं तर अजित पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जाईल. कारण धनंजय मुंडे हे अजित पवारांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात. अशावेळी धनुभाऊ जर भाजपमध्ये गेले तर अजित पवारांना मोठा झटका बसेल.
धनंजय मुंडेना मंत्रिपद मिळणार नाही – बजरंग सोनवणे
दरम्यान, काही झालं तरी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना मंत्रीपद मिळणार नाही असे विधान बीडचे खासदार बजरंग बाप्पा सोनावणे यांनी केल आहे. धनंजय मंडे मंत्री होणारच नाहीत, जर तर वर मी बोलणार नाही. मी जबाबदारीने सांगतोय. आता ते महाराष्ट्राच्या, दिल्लीच्या मंत्रिमंडळात पुन्हा दिसणार नाही. त्यांना मंत्री व्हायचं असेल तर अमेरिकेला जावं लागेल अशा शब्दात बजरंग बाप्पा सोनावणे यांनी धनंजय मुंडे यांना डिवचले. 2 गोष्टी पक्क्या आहेत, वाल्मिक कराडला जामीन मिळणार नाही आणि धनंजय मुंडे यांना मंत्रिपद मिळणार नाही, असं बजरंग बाप्पा सोनवणे यांनी म्हटल.





