Marathi News

भाजपाच्या ‘त्या’ दोन बड्या नेत्यांची शिर्डीत बंद दाराच्या आड चर्चा; मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचं काय होणार?

Written by:Rohit Shinde
Published:
शिर्डीत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी मंत्री रावसाहेब दानवे यांची भेट झाल्याची माहिती आहे. त्यामुळे मनोज जरांगेंच्या आंदोलनाबाबत या ठिकाणी काही चर्चा झाली का, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
भाजपाच्या ‘त्या’ दोन बड्या नेत्यांची शिर्डीत बंद दाराच्या आड चर्चा; मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचं काय होणार?

मनोज जरांगे पाटील आणि सरकार या संघर्षाला आता वेगळं वळण मिळताना दिसत आहे. जरांगे मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. त्यांच्यासोबत शेकडो मराठा समाजाचे आंदोलक असून काहीही झालं तरी मी मुंबईत धडकणारच, असं त्यांनी म्हटलं आहे. मुंबईत आल्यावर मी बेमुदत उपोषण करणार आहे, अशी भूमिका त्यांनी जाहीर केलेली आहे. सरकारने मात्र मोठी खेळी खेळली असून त्यांचे उपोषण फक्त एका दिवसावर आणण्यात आले आहे. त्यामुळे आता नेमकं काय होणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अशा परिस्थितीत खरंतर आता आणखी एक धक्कादायक आणि तितकची महत्वाची बातमी समोर येत आहे.

भाजपाच्या दोन नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा

मनोज जरांगे यांनी मोर्चा थांबवावा यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. याचाच एक भाग म्हणून शिर्डीत भाजजपच्या दोन बड्या नेत्यांची बंद दाराआड चर्चा होत असल्याची माहिती मिळत आहे. महाराष्ट्रातील सध्याच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिर्डीतून मोठी बातमी समोर येत आहे. शिर्डीत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी मंत्री रावसाहेब दानवे यांची भेट झाल्याची माहिती आहे. दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड बैठक पार पडत असल्याची माहिती समोर येत आहे. शिर्डीतील शासकीय विश्रामगृहात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरु आहे.  आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांमध्ये बैठक पार पडत असल्याची माहिती आहे. राधाकृष्ण विखे पाटील हे मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष आहेत. तर रावसाहेब दानवे हे ज्येष्ठ नेते आहेत. ते आज शिर्डीत शासकीय विश्रामगृहात आल्याची माहिती मिळाल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील त्यांच्या भेटीसाठी गेले. त्यामुळे सरकारचे हे आंदोलन दडपण्यासाठी काही प्रयत्न सुरू आहेत का, असा सवाल निर्माण झाला आहे.

बेमुदत उपोषण करणार -मनोज जरांगे

सरकारने मनोज जरांगेंना अवघा एक दिवस आंदोलनाची परवनागी दिल्यानंतर आता त्यामध्ये मनोज जरांगेंची प्रतिक्रिया समोर आली आहे. “लोकशाहीचं कायद्याचं सर्व नियामांचं आम्ही पालन करणार, माझा समाज देखील पालन करणार. आम्ही हट्टी नाहीयेत. तुम्ही जे सांगितलं आहे, त्या निर्णयाचं मराठ्यांकडून तंतोतंत पालन होणार, पण आम्ही एक दिवसाचं आंदोलन करणार नाही आम्ही बेमुदत आंदोलन करणार. बाकीच्या त्यांच्या सर्व नियमांचं आम्ही पालन करणार,” अशा शब्दांत प्रतिक्रिया देत मनोज जरांगेंनी बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे.

आंदोलनाला आझाद मैदान येथे परवानगी देताना घालण्यात आलेली सर्वात मोठी आणि महत्त्वाची अट म्हणजे या आंदोलनाला केवळ एक दिवसाचीच परवानगी देण्यात आली आहे. तसेच कोणत्या शासकीय सुट्टीच्या दिवशी व शनिवारी आणि रविवारी आंदोलनाला परवानगी देण्यात येणार नसल्याचं या आदेशात म्हटलं आहे. तसेच आंदोनासाठी कमाल पाच हजार आंदोलकांची अट घालण्यात आली आहे.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews