दत्ता भरणेंची कृषिमंत्री म्हणून वर्णी; शेतकरी कर्जमाफीवर भरणेंचे नियोजन काय? भरणे म्हणाले…

Written by:Rohit Shinde
Published:
मंत्री दत्ता भरणेंना शेतकरी कर्जमाफीबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी यावर अत्यंत सावध असे उत्तर दिले. त्यामुळे कर्जमाफी मिळणार की नाही असा सवाल निर्माण झाला आहे.
दत्ता भरणेंची कृषिमंत्री म्हणून वर्णी; शेतकरी कर्जमाफीवर भरणेंचे नियोजन काय? भरणे म्हणाले…

वादग्रस्त विधाने आणि रम्मीचा डाव खेळणे माणिकराव कोकाटेंना चांगलेच महागात पडले आहे. वादग्रस्त विधानं करणाऱ्या माणिकराव कोकाटेंकडून अखेर कृषि खात काढून घेण्यात आले आहे. दत्तात्रय भरणेंना राज्याचे नवे कृषिमंत्री म्हणून पदभार देण्यात आला आहे. तर, राजीनामा न घेता कोकाटेंना क्रीडा व युवक कल्याण विभागाचा पदभार देण्यात आला आहे. यामुळे वादग्रस्त वागणाऱ्या मंत्री आणि आमदारांना मात्र या निमित्ताने चांगलीच चपराक बसली आहे. त्यामुळे आता भरणेंच्या काळात तरी शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा मार्गी लागणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे.

दत्ता भरणे राज्याचे कृषिमंत्री

ज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. या बैठकीत कोकाटेंकडील कृषिखातं काढून घेण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर रात्री उशिरा कोकाटेंचा राजीनामा न घेता त्यांच्याकडील कृषिखात काढून घेत त्यांना दत्ता भरणेंकडील खात्याचे मंत्री बनवण्यात आले आहे.  याबाबतची शासन अधिसूचनादेखील जारी करण्यात आली आहे. तर माणिकराव कोकाटेंना क्रिडा आणि युवक कल्याणची जबाबदारी पाहावी लागणार आहे.

शेतकरी कर्जमाफी मिळणार का?

मंत्री दत्ता भरणेंना शेतकरी कर्जमाफीबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी यावर अत्यंत सावध असे उत्तर दिले. “अजून मी चार्ज घेतलेला नाही. संपूर्ण माहिती घेईन. माहिती घेतल्यावर निश्चित आपल्याशी बोलेनं. माझ्या शेतकऱ्याला न्याय कसा देता येईल, प्रश्न कसे सोडवता येतील हा माझा प्रयत्न आहे” असं दत्तात्रय भरणे म्हणाले. महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या होत आहेत, कृषी खात्यासाठी रोडमॅप काय असेल? या मुद्दावर ते म्हणाले की, “पदभार संभाळल्यानंतर यावर बोलणं उचित ठरेल. माझ्या शेतकरी बांधवासाठी जे काही करता येईल, ते करण्याचा माझ्या सारख्या कार्यकर्त्याचा प्रयत्न असेल” भरणेंच्या या उत्तराने संभ्रम वाढला आहे.

दत्तात्रय भरणे यांनी सूचक विधान करत कृषि खातं त्यांच्याकडे येणार असल्याचे संकेत दिले होते. “कृषी खात्याच्या संदर्भात मला अजून तरी काहीही माहिती नाही. मात्र, बारामतीकर न मागता सगळं देतात.” यावरून दत्ता भरणेंना आपल्याला कृषिमंत्रीपद मिळणार, हे आधीच माहिती असल्याची माहिती समोर येत आहे. आणि आज अखेर भरणेंच्या गळ्यात कृषिमंत्रीपदाची माळ पडली आहे.