काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप भाजपाच्या वाटेवर? भाजप प्रवेश करणार असल्याची पुरंदर मतदारसंघात चर्चा

Written by:Rohit Shinde
Published:
पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप यांचे नावही चर्चेत असून, ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा रंगली आहे.
काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप भाजपाच्या वाटेवर? भाजप प्रवेश करणार असल्याची पुरंदर मतदारसंघात चर्चा

पुणे जिल्ह्यात अनेक मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप यांचे नाव चर्चेत असून, ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनीच त्यांच्यावर पक्षबदलासाठी दबाव वाढवला असून, या पार्श्वभूमीवर बैठकांचं आयोजन करून कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे संजय जगताप आगामी काळात भाजपाचे कमळ हाती घेण्याची शक्यता नाकारता येत नाही, मात्र जगताप भाजपात गेले, तर काँग्रेससाठी हा मोठा धक्का असेल.

स्थानिक कार्यकर्त्यांचा भाजप प्रवेशासाठी आग्रह

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जगताप यांनी भाजपात प्रवेश करावा अशी मागणी कार्यकर्ते आणि समर्थकांकडून केली जात असल्याची माहिती समोर येत आहे. सासवड आणि जेजुरी येथील काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी संजय जगताप यांना भेटून भाजपमध्ये प्रवेश करण्याची मागणी केली आहे. संजय जगताप यांनी वारंवार या बातम्या नाकारल्या आहेत. कार्यकर्त्यांचा मोठा रेटा भाजपमध्ये प्रवेश करण्याचा आहे. परंतु अद्यापही संजय जगताप यांची अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. संजय जगताप याबाबत काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

‘सत्तेशिवाय शहाणपण नाही’; कार्यकर्त्यांची भावना

राज्यात काँग्रेसची अवस्था काही सुधारण्याचे नाव घेत नाही. अशाी परिस्थितीत माजी आमदार संजय जगताप यांनी साथ सोडल्यास हा पक्षाला मोठा धक्का असेल, संजय जगताप यांचे निकटवर्तीय आणि भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी याआधीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर पुरंदर-हवेली परिसरातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्येही सत्तेच्या जवळ जाण्याची चळवळ सुरू झाली आहे. “सत्तेशिवाय शहाणपण नाही,” या भूमिकेतून अनेक कार्यकर्त्यांनी संजय जगताप यांना भाजपमध्ये जाण्याचा आग्रह धरला आहे. जगताप यांचे संघटनक्षमता, विविध सामाजिक संस्थांमधील प्रभाव, आणि तरुण कार्यकर्त्यांची फळी पाहता, भाजपसाठी ते फायदेशीर ठरू शकतात. भाजपच्या प्रदेश नेत्यांकडूनही त्यांच्या प्रवेशासाठी हालचाली सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

संजय जगतापांचे संघासोबत जिव्हाळ्याचे संबंध

संजय जगताप यांचे आरएसएस कार्यकर्त्यांशी पूर्वीपासून चांगले संबंध आहेत. यामुळे त्यांच्या प्रवेशाला संघाचा विरोध असण्याची शक्यता कमी आहे. काही महिन्यांपूर्वी हे संबंध निवडणुकीच्या कारणाने तणावात आले असले, तरी आता नव्या समीकरणांतून ते पुन्हा सुसंगत होण्याची शक्यता आहे.त्यामुळे जगताप यांच्या भाजपा प्रवेशासाठी पक्षाची दारे कायम खुली असल्याचे सांगण्यात येत आहे.