मुंब्र्यातील एमआयएमच्या तरुण नगरसेविका सहर शेख आणि त्यांचे वडील युनूस शेख सध्या जोरदार चर्चेत आले आहेत. नगरसेविका म्हणून निवडून आल्यानंतर सहर शेख यांनी येणाऱ्या काळात आपण संपूर्ण मुंब्रा हिरवा करू अस म्हणत विरोधकांना आव्हान दिले. या विधानानंतर सहर शेखला नोटीस पाठवण्यात आली. यानंतर आपल्या विधानावर तिने स्पष्टीकरण देत आमच्या पक्षाचा झेंडा हिरव्या रंगाचा आहे, म्हणून मी तसे बोलल्याचे सहर शेख यांनी म्हटल. याबाबत आता भाजपचे नेते आणि राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांना विचारलं असता त्यांनी एक प्रकारे सहर शेख हिला पाठिंबा देत सरकारलाच घरचा आहेर दिला आहे.
काय म्हणाले गणेश नाईक?
त्यांच्या पक्षाच्या झेंड्याचा रंग हिरवा आहे, त्याचे आपण किती भांडवल करायचे असेल ते करू शकतो. आपण देखील भगवामय करून टाकू असे बोलतो, असे गणेश नाईक यांनी म्हटले. तसेच इम्तियाज जलील यांना सुद्धा आपण कायदेशीररित्या आव्हान देऊ शकत नाही, आपल्या तिरंग्यात देखील हिरवा रंग आहे, असे म्हणत गणेश नाईक यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
यापूर्वी जलील यांचा सहर शेखला फुल सपोर्ट
यापूर्वी एमआयएमचे महाराष्ट्रातील नंबर एकचे नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी सहर शेखला फुल सपोर्ट दर्शवला. अनेक आमदार मुसलमान विरोधात बोलतात, अहमदनगरचा एक आमदार, भाजपची एक महिला नेत्या आणि एक तोत्रा मुस्लिम विरोधात बोलत असतात मग त्यांच्यावर काय कारवाई केली? असा सवाल जलील यांनी उपस्थित केला. तुमची सत्ता आहे तर कानून तुमच्यासारखे चालणार का? मी विचारतो की कोणत्या नियमाखाली पोलिसांनी या लहान मुलीला नोटीस पाठवली? सहर शेखने जे स्टेटमेंट दिले त्यावरून आम्ही मागे हटणार नाही. फक्त मुंब्रा नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही हिरवा रंग पसरवू, हे मी ठणकावून सांगतो, असा इशारा इम्तियाज जलील यांनी दिला.
शहर शेख नेमकं काय म्हणाली होती??
मुंब्र्यात नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर विजयी सभेत बोलताना सहर शेख यांनी जितेंद्र आव्हाड यांना ललकारले. काहींना वाटत होतो आपण त्यांचे गुलाम आहोत, पण आमच्यासाठी फक्त अल्लाह सर्वोच्च आहे, आम्ही कोणाच्या बापाचे मिंधे नाही. प्रभाग क्रमांक 30 मध्ये सगळ्यांनी भरभरुन मतदान करुन एमआयएमच्या उमेदवारांना जिंकवले. पाच वर्षांनी याठिकाणी पुन्हा निवडणूक होईल, तेव्हा यापेक्षा मोठं प्रत्युत्तर द्यायचे आहे. संपूर्ण मुंब्रा आपल्याला हिरव्या रंगाने व्यापून टाकायचा आहे. या लोकांना इथून पळून जावे लागले पाहिजे. पाच वर्षांनी मुंब्रा परिसरात सगळे एमआयएमचे उमेदवार निवडून येतील, ही मजलिसची ताकद आहे असे सहर शेख यांनी म्हटल






