Gautam Adani : अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी आज (28 डिसेंबर) बारामती दौऱ्यावर आहेत. ‘शरद पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजेंस’चे उद्घाटन त्यांच्या हस्ते आहे. आजच्या या कार्यक्रमाला अजित पवार आणि रोहित पवार हे दोघेही उपस्थित होते. महत्त्वाची बाब म्हणजे रोहित पवार यांनी पुन्हा एकदा अदानी यांच्या गाडीचे सारथ्य केले. एकीकडे आधीच विरोधक अदानी आणि नरेंद्र मोदी यांच्या संबंधांवरून रान उठवत असतात. तर दुसरीकडे शरद पवार आणि गौतम अदानी यांच्यातील संबंधही लपून राहिलेले नाहीत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस फुटीवरून अदानी यांच्या बद्दल खळबळजनक विधान केलं आहे.
काय म्हणाले संजय राऊत
आज प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, शरद पवार आणि गौतम अदानी (Gautam Adani) यांचे संबंध राजकीय नाहीत. कौटुंबिक आणि व्यक्तिगत आहेत. आपल्या कार्यक्रमाला कोणाला बोलवायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. त्यांनी अदानींना बोलवलं असेल. यासाठी पवारांचे संपूर्ण कुटुंब ज्यांनी पक्ष फोडला ते अजित पवारही उपस्थित असतील तर तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. परंतु शरद पवारांचा पक्ष फोडण्यात गौतम अदानींच्या भावाचा सहभाग होता, अशी माहिती होती. अजित पवारांना पक्षातून फोडण्यास अदानी होते अशी माहिती मी वाचली आणि ऐकली आहे असे म्हणत संजय राऊत यांनी खळबळ उडवून दिली.
अदानी यांना आमचा नैतिक विरोध (Gautam Adani)
मुंबईवर मोदींचा आणि भाजपचा मित्र ज्या पद्धतीने ताबा मिळवत आहे, त्याला आमचा तात्विक आणि नैतिक विरोध आहे. गौतम अदानी यांना मुंबईला ताब्यात घेण्याच्या विरोधात मुंबईची लढाई आहे. टाटा, बिर्ला, अंबानी यांच्यासह अनेक उद्योगपती या मुंबईमध्ये आलेत. पण ज्या पद्धतीने अदानींना मुंबई गिळण्यासाठी उत्तेजन दिले जात आहे, हे मुंबईसाठी आणि मराठी माणसासाठी अत्यंत घातक आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.





