उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असून, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चांना पुन्हा एकदा वेग आला आहे. अजित पवार यांची अखेरपर्यंतची इच्छा राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध राहावी, अशीच होती, असा ठाम दावा शरद पवार, जयंत पाटील आणि शशिकांत शिंदे यांच्यासह पवार गटातील वरिष्ठ नेत्यांनी केला आहे. या इच्छेची पूर्तता करण्यासाठी अजित पवार यांच्यासोबत थेट चर्चा आणि बैठका झाल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे. मात्र, या सर्व घडामोडींवर अजित पवार गटाकडून ठोस प्रतिक्रिया येत नसून, विलिनीकरणाच्या मुद्द्यावर हा गट जाणीवपूर्वक मौन बाळगत असल्याचं स्पष्ट दिसत आहे. अशाच वेळी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या एका दाव्यामुळे राज्याच्या राजकारणात नवा स्फोट झाला आहे.

एनडीएला पाठिंबा देण्याच्या अटीवरच विलिनीकरण

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना विजय वडेट्टीवार यांनी थेट आरोप करत म्हटलं की, “राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणासाठी गुजरातमधील एका बड्या उद्योगपतीकडून मध्यस्थी करण्यात आली होती. दोन्ही गटांमध्ये समेट घडवून आणण्याचा प्रयत्न झाला. मात्र, या विलिनीकरणाच्या बदल्यात NDA ला पाठिंबा देण्याची अट पुढे आली आणि याच मुद्द्यावर ही संपूर्ण प्रक्रिया ठप्प झाली.” एनडीएला पाठिंबा देण्याच्या अटीवरच विलिनीकरणाचा सारा खेळ अडकल्याचा दावा करत वडेट्टीवार यांनी थेट केंद्रातील सत्तासमीकरणांवर बोट ठेवलं आहे.

अदानींचा बारामती दौरा आणि राजकीय तर्क-वितर्क

या दाव्याला अधिक धार देणारी बाब म्हणजे, काही दिवसांपूर्वी उद्योगपती गौतम अदानी यांचा बारामती दौरा. बारामतीत AI सेंटर ऑफ एक्सलन्सचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं होतं. या कार्यक्रमाला शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार यांच्यासह पवार कुटुंब आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. याच घटनेचा संदर्भ घेत वडेट्टीवार यांनी हा दावा केल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. मात्र, या आरोपांवर अद्याप राष्ट्रवादी काँग्रेस किंवा संबंधित उद्योगपतींकडून कोणतीही अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही.