मराठवाड्यात काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील जालना मतदारसंघातील काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार कैलास गोरंट्याल हे भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती आहे. गोरंट्याला यांनी भाजपात प्रवेश केल्यास राज्यात काँग्रेसला मोठे खिंडार पडणार हे मात्र नक्की. भाजपच्या बड्या नेत्याच्या ते संपर्कात असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वीच ते भाजपचे कमळ हाती घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर कैलास गोरंट्याल यांनी काँग्रेस नेतृत्वाच्या विरोधात उघड भूमिका घेतली होती.
शायरीच्या माध्यमातून पक्ष सोडण्याचे संकेत
कब का टूथ चुका था मैं,
बस बिखरना है मुझे…
तुम्हारे हजारो साल से मेरी खामोशी सही,
न जाने कितने राजो को पर्दा रखती है..!
अशी भन्नाट शायरी करत कैलास गोरंट्याल यांनी काँग्रेस सोडून भाजपातील प्रवेशाचे संकेत दिले आहेत. मला पक्षाने फक्त तिकीट दिले बाकी, काही नाही. फक्त तिकीट देऊन वाऱ्यावर सोडले, अशी टीका देखील त्यांनी काँग्रेस नेतृत्वावर केली. जालन्यामध्ये आपल्याच माणसांनी घात केल्याची खदखदही त्यांनी व्यक्त केली होती. यावेळी माझं झालं, 2029 तुमचं असं होऊ नये म्हणून तुम्हाला सांगतोय असा सल्ला गोरंट्याल यांनी जालन्याचे खासदार कल्याण काळे यांना दिला होता. खासदार कल्याण काळे यांच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी त्यांनी मनातील खदखद बोलून दाखवली होती. तेव्हापासून कैलास गोरंट्याल यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा जोर धरत होती.
आता माघार नाही -कैलास गोरंट्याल
“आता माघार नाही, लवकरच पेढे भेटणार म्हणत त्यांनी भाजप प्रवेशाचे संकेत दिले. विधानसभा निवडणुकीत मी रनिंग आमदार असताना फर्स्ट लॉटमध्ये मला तिकीट दिलं नाही, तो उशीर केल्यामुळे रिझल्ट निगेटिव्ह झाला. याशिवाय मला पक्षाने फक्त तिकीट दिले, नेत्यांची सभा दिली नाही आणि राजकारणामध्ये द्यावं लागतं, करावं लागतं, ते काहीही दिलं नाही, असं कैलास गोरंट्याल यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं आहे. त्यामुळे काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचे गोरंट्याल यांनी पूर्ण मन बनविल्याचे या निमित्ताने स्पष्ट होत आहे. कैलास गोरंट्याल विधानसभा निवडणुकीपासून पक्षात चांगलेच नाराज होते. त्यांनी अनेकदा आपली नाराजी उघडपणे बोलून दाखविल्याचे देखील अनेकदा पाहायला मिळाले.





