मुंबईतून मोठी बातमी समोर येत आहे. आज पहाटे लाखो मराठा बांधवांसह मनोज जरांगे-पाटील मुंबईत दाखल झाले आहेत. यावेळी पाच हजारांपेक्षा अधिक मराठा आंदोलक जरांगेंच्या आधीच आझाद मैदानावर पोहोचले होते. शिवाय, आता मुंबईत आंदोलकांच्या वाहनांची देखील मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता आझाद मैदानातील आंदोलन नेमके कसे केले जाणार, त्याचबरोबर सरकार आता काय भूमिका घेणार, हे पाहणे यानिमित्ताने महत्वाचे ठरणार आहे.
मनोज जरांगे मुंबईत दाखल, आंदोलनाची दिशा काय?
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे मुंबईत दाखल झाले आहेत. सरकारचे शिष्टमंडळ जरांगे पाटलांची समजूत काढण्यात अपयशी ठरले. जरांगे पाटील हे ओबीसीमधून आरक्षण मिळवण्यासाठी आझाद मैदानावर उपोषणाला बसणार आहेत. मागील काही दिवसांपासून ते ओबीसीमधून आरक्षण मिळवण्यासाठी उपोषण करताना दिसत आहेत. आता त्यांनी थेट मुंबई गाठली आहे. दुसरीकडे ओबीसींचा या आरक्षणाला विरोध आहे. जर मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण मिळाले तर तो आमच्यावर मोठा अन्याय आहे आणि त्याच्या विरोधात आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा ओबीसी महासंघाने दिलाय. आझाद मैदानावर जरांगे पाटील यांना फक्त आज आंदोलनासाठी परवानगी मिळाली आहे.
आंदोलक हे मोठ्या संख्येने आझाद मैदानावर पोहोचले आहेत. पोलिसांनी काही नियम आणि अटी लावून या आंदोलनाला परवानगी दिली आहे. मोठा ताफा घेऊन जरांगे पाटील हे मुंबईत दाखल झाले आहेत. पोलिसांनी पाच हजार लोकांच्या परवानगी या आंदोलनासाठी दिली आहे. मनोज जरांगे पाटील हे जोरदार शक्तीप्रदर्शन करत मुंबईत दाखल झाल्याचे बघायला मिळतं आहे. दुसरीकडे प्रत्यक्ष आंदोलनस्थळ म्हणजे आझाद मैदानही हाऊसफुल्ल झालंय. मनोज जरांगेंनी आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आझाद मैदानावर आंदोलनाची परवानगी दिलीये. त्यामुळे संध्याकाळी सहानंतर मनोज जरांगे आणि मराठा आंदोलक काय भूमिका घेणार हे पहाणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. आंदोलनाची परवानगी वाढवून घेतली जाण्याची शक्यता आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख मागण्या
- मराठा कुणबी एक आहेत. याची अंमलबजावणी झाली पाहिजे, त्याशिवाय मुंबई सोडणार नाही, ही मनोज जरांगे पाटलांची प्रमुख मागणी आहे.
- हैदराबाद गझेटियर, सातारा गॅझेटीयर, बाँबे गॅझेटियर लागू करावे, अशी मागणी मनोज जरांगे पाटील सातत्याने करत आले आहेत.
- सगे सोयरेचा अध्यादेश काढून दीड वर्ष झाले, ज्याची कुणबी नोंद सापडली आहे त्याचे सगे सोयरे आरक्षणात घेण्याची मागणी.
- सरसकट गुन्हे मागे घेणार होते. त्यासंदर्भात आंदोलकांवरील गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत.
- ओबीसी कोट्यातून कायद्याच्या चौकटीत टीकणारे आरक्षण मराठा समाजाला मिळावे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची काय भूमिका?
मराठा आणि ओबीसी या दोनंही समाजांवर अन्याय होणार नाही, याची काळजी सरकार घेईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. ओबीसींमध्ये जवळपास ३५० जाती आहेत, असं सांगत त्यांनी वैद्यकीय प्रवेशाचे कट ऑफच सांगितले आहेत. मेडिकल प्रवेशाचं बघितल्यास ओबीसीचा कट ऑफ एसीबीच्या वर आहे आणि एसीबीची कट ऑफ इडब्ल्यूएसच्या वर आहे. अशा स्थितीत ओबीसीतून आरक्षणाच्या मागणीनं कुणाचं भल होईल, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. मराठा समाजाच्या हिताचा विचार करुन मागणी व्हायला हवी, असं फडणवीस म्हणालेत. एसीबीसी आणि इड्ब्ल्यूएसची मागणी असेल तर राजकीय आरक्षम मिळणार नाही. मात्र राजकीय आरक्षणाचा हेतू असेल तर वेगळी गोष्ट असल्याचंही त्यांनी म्हटलंय. सामाजिक, आर्थिक परिवर्तानाची लढाई असेल तर मागणीचा योग्य विचार काही विचारवंतांनी करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केलीय.
सरकारसाठी जरांगेंचं आंदोलन राजकीय नाही, सरकार त्याला सामाजिक प्रश्न म्हणून बघतोय. मात्र काही राजकीय पक्ष या आंदोलनाच्या खांद्यावर बंदूक ठेवून फायदा मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोपही त्यांनी केलाय. जरांगेंच्या आंदोलनात यापूर्वी काय झालं, हे सगळ्यांनी पाहिलेलं आहे, असंही मुख्यमंत्री म्हणालेत. त्यामुळे सध्यातरी या आंदोलनाबाबत सरकारची भूमिका अत्यंत तटस्थ अशा स्वरूपाची पाहायला मिळत आहे.






