बंजारा समाजाला एसटीमधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी समाज आक्रमक झाला आहे. यामध्ये आता जालन्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे, समाजाने मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आज जालना शहरात भव्य अशा स्वरूपाचा मोर्चा काढला. जालना येथे बंजारा समाजाकडून एसटी प्रवर्गात आरक्षण द्यावं, या मागणीसाठी महामोर्चा काढण्यात आला.
जालन्यात बंजारा समाजाचा महामोर्चा
जालना येथे बंजारा समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. अखिल भारतीय बंजारा आरक्षण समितीच्या वतीने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. हैदराबाद गॅझेट लागू करून बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी या मोर्चाद्वारे करण्यात आली. बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटियरनुसार कुणबी प्रमाणपत्र वितरित करण्यासाठी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. त्याच धर्तीवर बंजारा समाजालाही हैदराबाद गॅझेट लागू करून एसटी आरक्षण मिळावे, अशी त्यांची मागणी आहे.
बंजारा समाज सध्या व्हीजेएनटी (ए) मध्ये आहे. तर हैदराबाद गॅझेटमध्ये बंजारा समाजाचा आदिवासी प्रवर्ग म्हणून उल्लेख आहे. त्यामुळे त्यांना एसटी प्रवर्गाचे आरक्षण मिळावे अशी बंजारा समाजाची भूमिका आहे. या मोर्चासाठी मोठ्या संख्येने बंजारा समाज रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले.
बंजारा समाजाची नेमकी मागणी काय?
मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानातील आंदोलनानंतर राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात नवा शासन आदेश काढला होता. यामध्ये राज्यात हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याची मराठा समाजाची मागणी मंजूर करण्यात आली होती. याचा मोठा फायदा मराठा समाजासोबत बंजारा समाजाला होण्याची शक्यता आहे. बंजारा समाज हा सध्या एनटी (ए) प्रवर्गात आहे. मात्र, हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाचा समावेश अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात जाण्याची शक्यता आहे. मुंबईत बंजारा समाजाच्या एक उच्चस्तरीय बैठकीचं आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर आता राज्यभरात बंजारा समाजाकडून आक्रमक अशा प्रकराची आंदोलने केली जात आहेत.





