उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांच्या एकत्र येण्याच्या आणि संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चांनी पुन्हा एकदा वेग घेतला आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील वरिष्ठ नेते ठामपणे सांगत आहेत की, अजित पवार यांची शेवटची इच्छा ही पक्ष एकत्र येण्याचीच होती. या दाव्याला खुद्द शरद पवार यांनीही दुजोरा दिल्याने या चर्चेला अधिकच वजन प्राप्त झालं आहे.
विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, अजित पवार यांना काका शरद पवार यांच्यापासून वेगळे झाल्याचा राजकीय आणि भावनिक डाग आयुष्याच्या अखेरीस पुसायचा होता. बहिण सुप्रिया सुळे यांच्याशी नात्यात आलेली दुरावा दूर करून कुटुंब एकत्र ठेवण्याचीही त्यांची तीव्र इच्छा होती. याच भावनेतून दोन राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र आणण्यासाठी हालचाली सुरू झाल्या. याला राजकीय कारणांचीही जोड होती. अजित पवार यांना पक्ष चालवताना स्वतःच्या गटातील अनेक नेत्यांकडून अपेक्षित सहकार्य मिळत नव्हतं. पुणे, पिंपरी-चिंचवडसारख्या महत्त्वाच्या राजकीय केंद्रांमध्ये, तसेच विधानसभा निवडणुकांमध्येही त्यांच्या पक्षातील नेते पुरेसे सक्रिय नव्हते, अशी खंत अजित पवारांनी जवळच्या वर्तुळात व्यक्त केल्याचं सूत्र सांगतात.
राजकारण विरुद्ध कुटुंब:
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससमोर थेट एनडीएसोबत जाण्याचा पर्याय खुला होता. मात्र, तसं झालं असतं तर इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला असता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पवार कुटुंब एकत्र येण्याची शक्यता कायमची संपली असती. त्यामुळे राजकीय फायद्यापेक्षा कुटुंब एकत्र ठेवण्याला प्राधान्य देण्याचा विचार दोन्ही बाजूंनी सुरू झाल्याचं समजतं.
विलिनीकरणाची सुरुवात कधी
दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेला नोव्हेंबर 2024 मधील नागपूर अधिवेशनानंतर स्पष्ट आकार मिळू लागला. यानंतर जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात सातत्याने बैठका झाल्या. या हालचालींची माहिती जेव्हा देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आली, तेव्हा त्यांनी “मला वरती बोलावं लागेल,” असं स्पष्ट केलं होतं. त्यानंतर 5 ऑक्टोबर 2025 रोजी अजित पवार यांनी अहिल्यानगर येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीत अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करून अंतिम भूमिका कळवतो, असं सांगितल्याचं सूत्र सांगतात.
दिल्लीचा ग्रीन सिग्नल, पण अटींसह
14 नोव्हेंबर 2025 रोजी पंतप्रधान कार्यालयाकडून सकारात्मक संकेत मिळाले. मात्र, मुख्यमंत्री आणि पक्षातील वरिष्ठांशी सल्लामसलत करून पुढील पावले उचलण्याचे निर्देश देण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी “मी वरती बोलतो,” असं आश्वासन दिलं. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी संघ आणि पक्षातील इतर वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून अखेर विलिनीकरणाला ग्रीन सिग्नल दिला. मात्र, हा निर्णय महानगरपालिका निवडणुकांनंतरच जाहीर करावा, अशी स्पष्ट अट घालण्यात आली.
16 जानेवारी रोजी अजित पवार, रोहित पवार, हर्षवर्धन पाटील, अमोल कोल्हे, सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांच्यात निर्णायक बैठक पार पडली. या बैठकीत प्रत्येकाने मनमोकळेपणाने शंका, भीती आणि अपेक्षा मांडल्या. यानंतर अजित पवार, सुनील तटकरे आणि सुप्रिया सुळे यांची स्वतंत्र, अत्यंत संवेदनशील बैठक झाली. 17 जानेवारी 2026 रोजी शरद पवार यांना संपूर्ण घटनाक्रमाची माहिती देण्यात आली.
या सर्व प्रक्रियेनंतर जिल्हा परिषद निवडणुका ‘घड्याळ’ या एकाच चिन्हावर लढवण्याचा निर्णय झाला. पुणे जिल्हा परिषद निवडणूक घड्याळावर लढवण्याची घोषणा करण्यात आली आणि या प्रचाराची धुरा अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांच्याकडे सोपवली. हा संपूर्ण घटनाक्रम केवळ राजकीय डावपेच नव्हता, तर तो एका नेत्याच्या अंतर्मनातल्या पश्चात्तापाचा, कुटुंब एकत्र ठेवण्याच्या ध्यासाचा आणि अपूर्ण राहिलेल्या इच्छेचा राजकीय प्रवास होता, अशी भावना राष्ट्रवादीतील अनेक ज्येष्ठ नेते व्यक्त करत आहेत





