राज्यात नवीन तालुके आणि नवीन जिल्हे निर्माण (New Districts In Maharashtra) होण्याच्या चर्चांना पुन्हा एकदा तोंड फुटलं आहे. आणि निमित्त ठरलं आहे ते म्हणजे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे विधान…. राज्यात ८१ तालुके आणि २० नवे जिल्हे बनवले जाणार असल्याचा प्रस्ताव सरकारकडे आला आहे. मात्र यावर सध्या तात्काळ निर्णय घेणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ते चंद्रपूर येथे बोलत होते..
काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे??
प्रसार माध्यमांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, राज्य सरकारकडे ८१ तालुके आणि २० नवे जिल्हे बनवण्याचा प्रस्ताव आला आहे. परंतु राज्याची भौगोलिक परिस्थितीचा विचार करुन आणि जोपर्यंत 2021 ची जनगणना पूर्ण होत नाही आणि त्याचा तपशील समोर येत नाही, तोपर्यंत नवे तालुके आणि नवे जिल्ह्यांसंदर्भात कोणताही निर्णय घेतला जाणार नाही..
नवीन जिल्हा निर्मितीच्या चर्चा यापूर्वीही – New Districts In Maharashtra
दरम्यान, महाराष्ट्रात नवीन जिल्हे आणि तालुके निर्माण होणार (New Districts In Maharashtra ) या चर्चा काय आत्ताच सुरु नाहीत. अनेक वर्षापासून अधून मधून या चर्चांना पेव फुटत असतो. याच्या आधी 2023 मध्ये नवीन जिल्हा आणि तालुका निर्मिती या चर्चांनी जोर धरला होता. त्यावेळी तत्कालीन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत बोलताना या सर्व चर्चा फेटाळून लावल्या होत्या. नवीन जिल्हा निर्मितीसाठी मोठा आर्थिक खर्च सहन करावा लागतो तसेच जिल्ह्याचे मुख्यालय कुठे असणारे यावरूनही वाद होण्याची शक्यता असते. नवीन जिल्ह्यात तयार करायचा असेल तर कमीत कमी 350 कोटी रुपये खर्च येतो. या कारणांनी मधल्या काळात नवीन जिल्हा निर्मितीची चर्चा रेंगाळली होती. मात्र आता चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विधानाने पुन्हा एकदा महाराष्ट्रात नवीन तालुके आणि जिल्हे तयार केले जाणार का?? या बातम्यांना वेग आलाय.






