Marathi News

हैदराबाद गॅझेट जीआरला ओबीसींचा विरोध; राज्यव्यापी आंदोलनाची तयारी, नागपुरातील बैठकीत मोठा निर्णय

Written by:Rohit Shinde
Published:
नागपूरमध्ये झालेल्या बैठकीला ओबीसी समाजातील अनेक प्रमुख नेत्यांनी उपस्थिती दर्शवली. या बैठकीत 10 ऑक्टोबर रोजी नागपूरमध्ये भव्य महामोर्चाचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
हैदराबाद गॅझेट जीआरला ओबीसींचा विरोध; राज्यव्यापी आंदोलनाची तयारी, नागपुरातील बैठकीत मोठा निर्णय

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर सरकारने राज्यात हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला आहे, त्या संदर्भात जीआर देखील काढण्यात आला आहे, मात्र हा जीआर निघाल्यानंतर आता ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण नको ही या समाजाची पहिल्यापासून भूमिका आहे. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर आज नागपूरमध्ये ओबीसी समाजाची बैठक पार पडली, या बैठकीला ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांची देखील उपस्थिती होती, या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

10 ऑक्टोबरला ओबीसी समाजाचा महामोर्चा

या बैठकीत 10 ऑक्टोबर रोजी नागपूरमध्ये भव्य महामोर्चाचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या मोर्चाला यशवंत स्टेडियम येथून सुरुवात होऊन संविधान चौकात समारोप होईल, असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. नागपूरमध्ये झालेल्या बैठकीला ओबीसी समाजातील अनेक प्रमुख नेत्यांनी उपस्थिती दर्शवली. त्यामध्ये आमदार विजय वडेट्टीवार हेही सामील होते. बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी राज्य सरकारवर कडक शब्दांत टीका केली.

वडेट्टीवार म्हणाले की, “हा जीआर ओबीसी समाजाच्या मूलभूत हक्कांवर आघात करणारा आहे. जरी कोणीही म्हटलं की यामुळे नुकसान होणार नाही, तरी प्रत्यक्षात ओबीसी समाजाला मोठा फटका बसला आहे.” वडेट्टीवार यांनी सांगितले की, “आज कायदेतज्ज्ञांशी चर्चा झाली असून, येत्या सोमवारी आम्ही नागपूर खंडपीठात याविरोधात याचिका दाखल करणार आहोत. याशिवाय, राज्यातील इतर खंडपीठांमध्ये स्थानिक ओबीसी कार्यकर्तेही स्वतंत्रपणे न्यायालयात धाव घेतील.” मुख्यमंत्र्यांनी या मुद्द्यावर तातडीने ओबीसी समाजाच्या प्रतिनिधींशी चर्चा करावी, अशी मागणीही त्यांनी केली. “जो कोणी या जीआरला पाठिंबा देतो, तो ओबीसी समाजाच्या न्याय्य लढ्याशी इमानेइतबारे नाही,” असे वडेट्टीवार यावेळी म्हणाले.

मराठा आरक्षणाच्या जीआरवर ओबीसीत असंतोष

मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने काढलेल्या जीआरवर ओबीसी समाजात तीव्र अशा असंतोषाची भावना निर्माण झाली आहे. ओबीसी नेत्यांचे म्हणणे आहे की, मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाचा परिणाम थेट ओबीसींच्या विद्यमान हक्कांवर होऊ शकतो. त्यामुळे त्यांचा शैक्षणिक आणि नोकरीतील वाटा कमी होण्याची भीती व्यक्त होत आहे. यामुळे ओबीसी समाजाने आंदोलनाची चेतावणी दिली आहे. विविध संघटना आणि नेते या प्रश्नावर सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेत आहेत. नागपूरसह राज्यभर बैठका आणि मोर्चांचे आयोजन सुरू झाले आहे. ओबीसी समाजाचे स्पष्ट मत आहे की, त्यांच्या हक्कांवर गदा आणली जाऊ नये आणि न्याय मिळावा.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews