Marathi News

हिंदी-मराठी वादात राज ठाकरेंविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका; पुढे काय होणार?

Written by:Rohit Shinde
Published:
मराठी-हिंदी वादावरून राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारी याचिका दाखल झाली आहे. सर्वोच्च न्यायालयात ही याचिका दाखल करण्यात आली आहे.
हिंदी-मराठी वादात राज ठाकरेंविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका; पुढे काय होणार?

राज्यातील हिंदी सक्तीच्या वादाचा विषय काही थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. मराठी -हिंदी वाद आणि मनसेची परप्रांतीयांविरोधातील भूमिका या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारी याचिका दाखल झाली आहे. सर्वोच्च न्यायालयात ही याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत ललिता कुमारी प्रकरणाचा निर्णयाचे दिशानिर्देश संपूर्ण देशभरात लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे. ही याचिका महाराष्ट्रातील रहिवाशी वकील घनश्याम दयालू उपाध्याय यांनी दाखल केली आहे.

राज ठाकरे, मनसे पक्षावर कारवाईची मागणी

राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश द्यावेत आणि त्यांच्या पक्षाची निवडणूक आयोगातील नोंदणी रद्द करावी. राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते दुसऱ्या राज्यातून आलेल्या लोकांच्या विरोधात हिंसाचार करत आहेत. हा प्रकार संविधानाच्या मूळ भावनेच्या आणि सर्वोच्च न्यायालयाच्या ललिता कुमारी प्रकरणात दिलेल्या निर्णयातील मार्गदर्शक तत्त्वांच्या विरोधात आहे, असे याचिकेत म्हटले असल्याचे समोर येत आहे. याचिकेत वकील घनश्याम दयालू यांनी महाराष्ट्र सरकार आणि निवडणूक आयोगाला सुद्धा पक्षकार बनवले आहे. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने अधिकार वापरत राज्य सरकार आणि संबंधित यंत्रणेला निर्देश द्यावे, अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे.

ललिता कुमारी प्रकरण नेमके काय?

ललिता कुमारी एक अल्पवयीन मुलगी होती. तिचे अपहरण करण्यात आले होते. त्यामुळे ललिता कुमारीचे वडील भोला कामत यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. त्यावेळी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिला. यामुळे त्यांनी भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३२ नुसार त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाने गंभीरतेने घेतले आणि ते घटनापीठाकडे पाठवले. पुढे सर्वोच्च न्यायालयात पाच सदस्यांची खंडपीठासमोर ललिता कुमारी प्रकरणावर सुनावणी झाली. सर्व बाजू ऐकल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने गंभीर प्रकरणात तक्रार मिळताच पोलिसांनी त्वरित एफआयआर दाखल केला पाहिजे, असे आदेश दिले गेले. तसेच एफआयआर दाखल करण्यासाठी पोलीस नकार देऊ शकत नाही. पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही तर पोलिसांवरच कारवाई करण्यात येईल.

यानिमित्ताने ललिता कुमारी प्रकरण नेमके इथे कितपत लागू होते, हा खरा प्रश्न आहे. कारण, मनसे – परप्रांतीय संघर्ष आणि ललिता कुमारी प्रकरणाचा फारसा ताळमेळ बसत नाही. अशा परिस्थितीत सर्वोच्च न्यायालय या याचिकेवर नेमका काय निर्णय देते हे पाहणे अत्यंत महत्वाचे ठरणार आहे.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews