Marathi News

Politics News: मुंबईत भाजपची भाषा बदलली!! शिंदे गटाला थेट इशारा; महापौर आमचाच, अन्यथा…

Published:
निवडणुकीपूर्वी आणि निकालानंतरही भाजप नेत्यांकडून “मुंबईत महायुतीचा महापौर बसेल” असं वक्तव्य केलं जात होतं. मात्र ‘भाजपचाच महापौर होईल’ असं विधान जाणीवपूर्वक टाळण्यात आलं होतं. पण आता परिस्थिती पूर्णपणे भाजपच्या बाजूने गेल्यानंतर भाजपच्या भूमिकेत बदल झाला.
Politics News: मुंबईत भाजपची भाषा बदलली!! शिंदे गटाला थेट इशारा; महापौर आमचाच, अन्यथा…

Politics News : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल लागून महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं असलं, तरी आता महापौर पदावरून महायुतीतच अंतर्गत वाद उफाळून आल्याचं चित्र आहे. विशेषतः शिंदे गट आणि भाजप यांच्यातील तणावामुळे राजकीय चर्चांना चांगलाच वेग आला आहे. महापालिका निवडणुकीत भाजपने ८९ जागांवर, तर शिंदे गटाने २९ जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे संख्याबळाच्या जोरावर भाजपचाच महापौर बसेल, हे जवळपास निश्चित मानलं जात होतं. मात्र निकालानंतर एकनाथ शिंदे यांनी आपल्या सर्व विजयी नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात संशय आणि चर्चांना उधाण आलं. यंदाचं वर्ष बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष असल्यामुळे महापौरपद शिंदे गटालाच मिळावं, अशी त्यांची इच्छा असल्याच्याही चर्चा रंगल्या होत्या.

भाजपचा शिंदे गटाला इशारा (Politics News)

मात्र आता भाजपने या सगळ्या चर्चांना पूर्णविराम देत शिंदे गटाला थेट आणि स्पष्ट इशारा दिला आहे. निवडणुकीपूर्वी आणि निकालानंतरही भाजप नेत्यांकडून “मुंबईत महायुतीचा महापौर बसेल” असं वक्तव्य केलं जात होतं. मात्र ‘भाजपचाच महापौर होईल’ असं विधान जाणीवपूर्वक टाळण्यात आलं होतं. पण आता परिस्थिती पूर्णपणे भाजपच्या बाजूने गेल्यानंतर भाजपच्या भूमिकेत बदल झाला. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी महापौरपदाबाबत आक्रमक भूमिका घेत शिंदे गटाला थेट इशारा दिला आहे. “महापौर भाजपचाच होईल, अन्यथा भाजप विरोधी पक्षात बसायला तयार आहे. दुसऱ्या पक्षाचा महापौर करण्यामध्ये भाजपच्या नगरसेवकांना अजिबात रस नाही,” असं स्पष्ट विधान मुनगंटीवार यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे हे विधान थेट शिंदे गटासाठीच असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. Politics News

महापौरपदाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली

दरम्यान, भाजप आणि शिवसेनेच्या नगरसेवकांची गटनोंदणी अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे महापौरपदाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर ३१ जानेवारी रोजी मतदान घेण्याचा निर्णय होता. मात्र सध्याची परिस्थिती पाहता मुंबईच्या नव्या महापौराची निवड आता फेब्रुवारीमध्ये होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महत्त्वाचं म्हणजे यंदा मुंबईच्या महापौर पदासाठी ओपन महिला आरक्षण लागलं असून, त्यामुळे मुंबईत पुन्हा एकदा महिलाराज पाहायला मिळणार आहे.

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews