Politics News : मुंब्र्यातील एमआयएमच्या तरुण नगरसेविका सहर शेख आणि त्यांचे वडील युनूस शेख सध्या जोरदार चर्चेत आले आहेत. नगरसेविका म्हणून निवडून आल्यानंतर सहर शेख आणि युनूस शेख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे ज्येष्ठ नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर अत्यंत आक्षेपार्ह आणि खालच्या पातळीवरची टीका केल्याने राजकीय वातावरण तापले आहे.
युनूस शेख यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका करत त्यांचा उल्लेख. “जुठा जितेंद्र” असा केला. तसेच “तुतारीची मुतारी करून टाका” अशा शब्दांत अपमानास्पद टीका करत “प्रभाग क्रमांक ३० मध्ये दिसलात तर कुत्र्यासारखा मारेन” आणि “डोकं फिरलं तर मुंब्र्यात तुमची एंट्री बंद करीन” अशी धमकी दिली. या प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झाला असून, जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थनार्थ आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावरून जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. Politics News
काय म्हणाले रोहित पवार
सोशल मीडियावर ट्विट करत रोहित पवार म्हणाले, “ज्येष्ठ नेते जितेंद्र आव्हाड साहेब यांनी कायम शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांची विचारधारा जपली, पण काही दिवसांपासून एमआयचा स्थानिक उमेदवार आणि त्याच्या नातेवाईकांकडून अत्यंत खालच्या पातळीवरची भाषा वापरली जाते. निवडून आलात म्हणजे हवेत जाऊन कशीही भाषा वापरण्याचा परवाना मिळत नाही. त्यांनी बोलताना तारतम्य बाळगावं, असली खालच्या पातळीची भाषा कदापि खपवून घेतली जाणार नाही. मुळात निवडणूक लढण्यासाठी एमआयएमला फंडींग कुठून मिळतं आणि हा पक्ष कुणाची बी टीम म्हणून काम करतो, हे वेगळं सांगायला नको. निवडून आलात तर फालतू गरळ ओकण्यापेक्षा संबंधितांनी लोकांची कामं करावीत. आम्ही मात्र कायम आव्हाड यांच्यासोबत आहोत,”
आधी एकत्र आता टीका (Politics News)
दरम्यान, जितेंद्र आव्हाड आणि युनूस शेख हे मागील अनेक वर्षांपासून एकत्र राजकारण करत होते. मात्र महापालिका निवडणुकीदरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी सहर शेख यांची उमेदवारी नाकारल्यानंतर युनूस शेख आणि सहर शेख यांनी एमआयएममध्ये प्रवेश केला. त्यानंतर ते निवडूनही आले. विजयानंतरच्या पहिल्याच भाषणात सहर शेख यांनी “कैसा हराया…” असा उल्लेख करत जितेंद्र आव्हाड यांना डिवचले होते. तसेच “पाच वर्षांनंतर संपूर्ण मुंब्रा शहर हिरव्या रंगात रंगवू” असे विधान केल्यानेही वाद निर्माण झाला होता. या संपूर्ण प्रकरणावर अद्याप जितेंद्र आव्हाड यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.






