शक्तिपीठ महामार्गाविरोधात आंदोलन; राजू शेट्टींसह 400 जणांविरोधात गुन्हा दाखल

Written by:Rohit Shinde
Published:
शक्तिपीठ महामार्ग विरोधात आंदोलन केल्याप्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्यासह 400 जणांवर गुन्हे दाखल...
शक्तिपीठ महामार्गाविरोधात आंदोलन; राजू शेट्टींसह 400 जणांविरोधात गुन्हा दाखल

शक्तिपीठ महामार्गाला होणारा विरोध दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत एकीकडे सरकार हा महामार्ग पूर्ण करण्यासाठी तयारी करत असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून तीव्र विरोध होताना दिसत आहे. शेतकऱ्यांच्या सुपीक जमीनी महामार्गाखाली जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत. यावर अनेक प्रतिक्रिया देखील येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता शक्तीपीठ महामार्ग विरोधात आंदोलन केल्याप्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्यासह 400 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

राजू शेट्टींसह 400 जणांवर गुन्हा

या शक्तीपीठ महामार्गाविरोधात राज्यातील बारा जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला, पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन केले. आता कोल्हापूरच्या शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात हे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यामध्ये राजू शेट्टी यांच्यासह माजी आमदार ऋतुराज पाटील, माजी आमदार राजू बाबा आवळे, शिवसेनेचे नेते विजय देवणे यांच्यासह 400 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. चक्काजाम आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांना नोटीस बजावण्यात आली होती. मात्र बंदीचे आदेश असतानाही जमाव एकत्र करून महामार्ग रोखल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

शक्तिपीठ महामार्गाला विरोध का?

शक्तिपीठ महामार्गाला विरोध करण्यामागे अनेक कारणे आहेत. हा महामार्ग कोल्हापूर जिल्ह्यातील निसर्गसंपन्न भागातून जाणार आहे, ज्यामुळे स्थानिक पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणावर ऱ्हास होण्याची भीती व्यक्त केली जाते. शिवाय, या महामार्गामुळे अनेक गावे विस्थापित होणार आहेत आणि शेतजमिनी नष्ट होणार आहेत. स्थानिक लोकांचे जीवनमान, सांस्कृतिक वारसा आणि पूजास्थळांवर त्याचा परिणाम होईल. लोकांचा आरोप आहे की, प्रकल्प राबवताना पारदर्शकता नाही आणि जनतेचा सहभाग घेतला जात नाही. अनेक पर्यावरणप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक ग्रामस्थ या प्रकल्पाविरोधात आंदोलन करत आहेत. त्यांच्या मते, विकासाच्या नावाखाली निसर्ग आणि लोकांचे हक्क पायदळी तुडवले जात आहेत, म्हणूनच त्यांचा तीव्र विरोध आहे.