MP Breaking News
Fri, Dec 19, 2025

चौंडीत मंत्रिमंडळाची बैठक, धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी नाही; शरद पवारांच्या आमदाराने देवेंद्र फडणवीसांचा ‘तो’ व्हिडिओ आधीच दाखवला

Written by:Arundhati Gadale
Published:
रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची पवित्र जन्मभूमी चोंडी जेथे आरक्षणाच्या लढ्याची सुरवात झाली.
चौंडीत मंत्रिमंडळाची बैठक, धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी नाही; शरद पवारांच्या आमदाराने देवेंद्र फडणवीसांचा ‘तो’ व्हिडिओ आधीच दाखवला

कर्जत : अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मदिनी मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक चौंडी येथे झाली. चौंडी येथे बैठक होणार असल्याने धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, धनगर आरक्षणाच्या संदर्भात कोणत्याच निर्णय घेण्यात आला नाही. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जुना व्हिडिओ ट्विट करत टीका केली.

रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘सत्ता आल्यावर पहिल्याच कॅबिनेटमध्ये धनगर आरक्षणाचा निर्णय मार्गी लावण्याचं आश्वासन देऊन 10 वर्षे उलटली आणि 300 हून अधिक मंत्रिमंडळ बैठका झाल्या.. शिवाय केंद्रात आणि राज्यात भाजपची एकहाती सत्ता असूनही धनगर आरक्षणाचा निर्णय अजूनही का होऊ शकला नाही?’

व्हिडिओमध्ये काय?

रोहित पवार यांनी ट्विट केलेल्या व्हिडिओमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाच्या संदर्भात केंद्र सरकारडे अहवाल आला आहे. धनगर समाजाच्या संदर्भातील योग्य शिफारशी केंद्र सरकारला पाठवल्या जातील, असे विधानसभेत सांगताना दिसत आहेत. ‘राज्य सरकारने प्रस्ताव पाठवला आणि केंद्राची मान्यता घेतली की लगेच प्रश्न मिटेल, असं सांगणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा अभ्यास अजूनही सुरूच आहे का? राज्यसरकारचे सकारात्मक प्रयत्न कधी फळास येतील?’, असा प्रश्न देखील रोहित पवार यांनी विचारला.

दगाफटका करणार नाहीत ही अपेक्षा

रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची पवित्र जन्मभूमी चोंडी जेथे आरक्षणाच्या लढ्याची सुरवात झाली आज त्याच पवित्र भूमीत प्रथमच होत असलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत तरी हा प्रश्न मार्गी लावला जाईल याची राज्यातील तमाम धनगर समाज बांधव वाट बघत आहेत.तसेच सरकार नेहमीप्रमाणे केवळ पोकळ घोषणा करून आणि आश्वासने देऊन बोळवण करणार नाही आणि दगाफटका करणार नाही, अशी अपेक्षा देखील रोहित पवार यांनी व्यक्त केली होती.