मुंबईत शिवसेना-मनसे युतीचा महापौर (कदाचित) बसणार नाही, पण मुंबईवर वर्चस्व मराठी माणसांचे म्हणजे ठाकरे बंधूंचेच राहिले असे म्हणत सामना अग्रलेखातून मुंबई महापालिका निवडणुकीचे राजकीय विश्लेषण करण्यात आला आहे. मुंबईतील सर्व मराठी पट्ट्यांत शिवसेना-मनसेचे उमेदवार विजयी झाले व उपऱ्यांच्या मुलुखात भाजपला जागा मिळाल्या. यात कसली आली चाणक्यगिरी? फडणवीस हे मुख्यमंत्री पदावर नसते तर त्यांना हा निकाल घेणे शक्य होते काय? असा सवालही सामनातून करण्यात आला.
काय म्हटलं सामना अग्रलेखात
पंतप्रधान मोदी यांनी राज्यातील मनपा निवडणुकांत ‘एनडीए’ला विजय मिळवून दिल्याबद्दल जनतेला धन्यवाद दिले आहेत. राज्यातील उत्साही जनतेने ‘एनडीए’च्या सुशासनाला आशीर्वाद दिल्याच्या भावना मोदी यांनी व्यक्त केल्या आहेत. त्याच वेळी महाराष्ट्रातील ताज्या विजयाचे श्रेय भाजप कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना दिले. फडणवीस यांनी सत्तेचा योग्य वापर महापालिका निवडणुकांत केल्याने विजय मिळाला व त्याबद्दल ते अभिनंदनास पात्र आहेत, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. वास्तविक पालिकांचे सर्व आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस हे भाजपच्या एजंटांसारखेच वागत होते. त्यामुळे फडणवीस यांचा विजय सोपा झाला.
हे ही वाचा
बहुमत हे पाऱ्याप्रमाणे चंचल असते
मुंबईच्या निकालाकडे सगळ्यांचेच लक्ष होते. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहा वगैरेंनी मुंबईत प्रचारास येण्याचे साहस दाखवले नाही. कारण भाजप हरण्याचीच भीती जास्त होती. त्यामुळे भाजप व शिंदे सेनेचा एकत्रित आकडा बहुमत दाखवत असला तरी त्यांच्याकडे फक्त चारचेच बहुमत आहे. शिवसेना, मनसे, काँगेस व ‘इतर’ मिळून पालिकेच्या सभागृहात शंभरच्यावर नगरसेवक विरोधी बाकांवर बसणार आहेत व हे ‘शंभर’ चारच्या तुटपुंज्या बहुमताला भारी पडतील. बहुमत हे पाऱ्याप्रमाणे चंचल असते. ते कधीही निसटेल अशी परिस्थिती आहे. म्हणून शिंदे गटाच्या निवडून आलेल्या नगरसेवकांना हॉटेलात ‘बंदी’ बनवून ठेवले असावे.
प्रचंड सत्ता, पैसा, निवडणूक आयोग हाताशी असूनही भाजप-शिंदे यांना जेमतेम काठावरचे बहुमत मिळाले. जयचंद शिंदे यांनी शिवसेनेचे पन्नासावर नगरसेवक फोडले. ते बहुतांश पराभूत झाले. मराठी मुलुखात भाजप व ‘जयचंद’ शिंदेंचा पैसा व भाईगिरी चालली नाही. मुंबईत शिवसेना-मनसे युतीचा महापौर (कदाचित) बसणार नाही, पण मुंबईवर वर्चस्व मराठी माणसांचे म्हणजे ठाकरे बंधूंचेच राहिले, असंही सामना अग्रलेखातून म्हटलं आहे