मिंध्या म्हणजे पिसाळ, खोपड्यांची अवलाद; सामनातून घणाघात

Published:
मराठी माणसाच्या नाकावर टिच्चून मुंबईत 'अदानी' धार्जिणा महापौर बसवायचे महाराष्ट्रद्रोही स्वप्न भाजपने पाहिले. ते पिसाळ, खोपड्यांची अवलाद मिंध्यांच्या मदतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला, याची नोंद महाराष्ट्राच्या इतिहासात काळ्याकुट्ट शाईने कायमची लिहिली जाईल.
मिंध्या म्हणजे पिसाळ, खोपड्यांची अवलाद; सामनातून घणाघात

मुंबईत ‘अदानी’ धार्जिणा महापौर बसवायचे महाराष्ट्रद्रोही स्वप्न भाजपने पाहिले. ते पिसाळ, खोपड्यांची अवलाद मिंध्यांच्या मदतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला, याची नोंद महाराष्ट्राच्या इतिहासात काळ्याकुट्ट शाईने कायमची लिहिली जाईल असं म्हणत सामना अग्रलेखातून एकनाथ शिंदे यांच्यावर निशाण साधण्यात आला आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिवसेना व मनसेने झुंज दिली, शर्थ केली. अटीतटीची लढत झाली. ही लढाई सुरूच राहील. मुंबई व मराठी अस्मितेचा लढा थांबणार नाही असे ठाकरे गटाने सामनातून म्हंटल आहे.

सामनातून काय म्हंटल?

प्रचंड गोंधळ आणि अनागोंदीत मुंबईसह 29 महानगरपालिकांचे निकाल लागले आहेत. रात्री उशिरापर्यंत मतमोजणीचा गोंधळ सुरूच आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई शहराकडे भारताचे लक्ष लागले होते. प्रचंड भ्रष्टाचार, शाई घोटाळा, ईव्हीएम घोटाळा, पैसे वाटप, बोगस आणि दुबार मतदानाच्या ताकदीवर उद्योगपती अदानी यांचा भाजपच्या मदतीने मुंबईवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. संपूर्ण निकाल येण्याआधीच भाजपने सुरू केलेला जल्लोष हा निवडणूक घोटाळ्याचाच भाग आहे. महाराष्ट्र आणि मराठी माणसासाठी हा धोक्याचा इशारा आहे. सत्ता, पैसा आणि निवडणूक आयोग हरकाम्याची भूमिका बजावत असेल तर निवडणुकीत कोणाही ऐऱ्यागैऱ्याची लाट येऊ शकते. या लाटांना आणि लहरींना काहीच अर्थ नसतो. मुंबईसह 26 महानगरपालिकांत भाजपची लाट आली व त्या लाटेवर ‘शहासेना’सारखे ‘हवशे-गवशे’ किनाऱ्याला लागले. ‘ना विचार ना भूमिका’ हेच सूत्र असल्याने यापुढे कोणत्याही निवडणुकांना अर्थ राहणार नाही. भाजप आणि शहासेनेने शंभरचा टप्पा पार केला. शिवसेना-मनसेने जोरात झुंज दिली, मुसंडी मारली, पण निवडणूक आयोग व सत्तेच्या मनमानीने घात केला. शेकडो मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता आला नाही व हे सर्व अधःपतन बघत निवडणूक आयोग अजगरासारखा पडून राहिला.

ते पिसाळ, खोपड्यांची अवलाद-

मराठी माणसाच्या नाकावर टिच्चून मुंबईत ‘अदानी’ धार्जिणा महापौर बसवायचे महाराष्ट्रद्रोही स्वप्न भाजपने पाहिले. ते पिसाळ, खोपड्यांची अवलाद मिंध्यांच्या मदतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला, याची नोंद महाराष्ट्राच्या इतिहासात काळ्याकुट्ट शाईने कायमची लिहिली जाईल. 106 हुतात्म्यांच्या बलिदानातून मराठी माणसाने मिळवलेल्या मुंबईचा घास शिंद्यांसारख्या मिंध्या माणसाच्या बेइमानीमुळे हातचा जाण्याची वेळ आली, पण आम्ही ते होऊ देणार नाही. भाजप व त्यांच्या मिंध्यांनी जिंकलेल्या जागा जर चोरून, विकत घेऊन मिळवल्या असतील तर मुंबई विकण्याची आणि विकत घेण्याची योजना मिंध्यांच्या मदतीने तडीस नेण्याचा गौतम अदानी, अमित शहा व त्यांच्या भाजपचा प्रयत्न आहे हे स्पष्ट आहे.

महाराष्ट्राच्या वैभवशाली राजधानीचे, मुंबई शहराचे भवितव्य काय? येथील मराठी माणसाला आधार कुणाचा? मुंबईचे ‘अदानीस्तान’ होत असताना या पानिपतात मराठीचा झेंडा टिकेल काय? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्याची उत्तरे येणारा काळच देईल, पण ज्यांनी शिवसेना- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पीछेहाटीस हातभार लावला, त्यांनी मुंबईतील हुतात्मा स्मारकाचा सौदा केला. मुंबईचे ‘अदानीस्तान’ होत असताना 106 हुतात्मे फक्त अश्रू ढाळणार नाहीत, तर ते पुढच्या लढ्यासाठी याच मुंबईत पुनर्जन्म घेतील. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिवसेना व मनसेने झुंज दिली, शर्थ केली. अटीतटीची लढत झाली. ही लढाई सुरूच राहील. मुंबई व मराठी अस्मितेचा लढा थांबणार नाही!

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews