मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी अनेकदा उपोषण आणि मोठी आंदोलने मनोज जरांगेंनी उभारली. दरम्यान आता मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलनाची हाक दिली असून, येत्या 29 ऑगस्ट रोजी मराठा बांधवांचा मोर्चा मुंबईत धडकणार आहे. अशा परिस्थिती जरांगे आणि ओबीसी नेते अशी लढाई पुन्हा एकदा सुरू झाली आहे. आज ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंनी एक खळबळजनक दावा केला आहे, त्यामुळे राजकीय वर्तुळात मात्र चर्चांना उधाण आले आहे.
जरांगे-शरद पवार छुपी युती -नवनाथ वाघमारे
ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी म्हटलं की, “जरांगे मुंबईला जात आहेत. परंतु पहिल्याप्रमाणे वाशीपासून परत येऊ नये. जरांगे जाणार नाहीत. शरद पवारांनी चावी दिली की, मनोज जरांगेंचं इंजिन टूक टूक करत राहतं. त्यामुळे जरांगेंना पुढे करून सरकारमध्येच राहून सरकारला वेठीस धरण्याचं काम एकनाथ शिंदे करीत आहेत. परंतु याचे मूळ मात्र शरद पवार, राजेश टोपे आणि कॉंग्रेसमधील काही खासदार-आमदार आहेत. त्यामुळे ही पावसाळ्यात उगवलेली तात्पुरती छत्री म्हणायची. दोन-पाच दिवसांसाठी ही नक्कीच मोडली जाईल.” असा दावा नवनाथ वाघमारेंनी केला आहे.
जरांगेंना मुंबईला जायचंच नाही. परंतु त्यांना थांबवण्यासाठी कोणी येतच नाही. प्रताप सरनाईक आले होते. त्यांना एकनाथ शिंदे यांनी पाठवलं होतं. परंतु ते थांबवण्यासाठी नाही, तर रसद पुरविण्यासाठी आले होते. इतकं नाटकं करणारं माणूस मी पाहिलेला नाही, असं देखील वाघमारे यांनी म्हटलंय. मराठा समाज भावनिक आहे. त्याचा फायदा मनोज जरांगे घेत असल्याचा आरोप नवनाथ वाघमारे यांनी केला आहे.
मराठा आरक्षणासाठी एल्गार!
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत आंदोलनाची घोषणा केली आहे. २९ ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदान आणि मंत्रालयावर मोर्चा नेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हा मोर्चा २७ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता अंतरवाली सराटी येथून सुरू होणार असून, तीन दिवसांनंतर मुंबईत आझाद मैदान व शासन दरबारी अर्थात मंत्रालयावर मराठा समाजाचा आवाज पुन्हा एकदा बुलंद होणार आहे. जर आंदोलकांवर अन्याय झाला, तर गावागावातले मुख्य व दुय्यम रस्ते बंद करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मैदानात उतरले आहे. यावेळी त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, आगामी आंदोलन मुंबईतच होणार आहे. हे आंदोलन निर्णायक ठरणार असून, मराठा समाजाच्या विजयाचा गुलाल उधळायचाच आहे, असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केलाय. मुंबईतील हे आंदोलन आता फक्त मागणीचं नाही, तर निर्णय घेण्यासाठीचं असेल, असे देखील त्यांनी म्हटले आहे.






