राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. शरद पवार हे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर शरद पवार यांची ही पहिलीच सांत्वनपर भेट असल्यानं या भेटीत विलीनीकरणाबाबत काय चर्चा होते का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आहे.
भेटीकडे सर्वांचे लक्ष्य
अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी बारामती येथील सहयोग सोसायटीत राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांनी गर्दी केली आहे. संपूर्ण पवार कुटुंबीय या ठिकाणी उपस्थित होते अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर शरद पवार हे सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी दाखल झाले. तब्बल दोन तासापासून शरद पवार आणि सुनेत्रा पवार यांच्या चर्चा सुरू असल्याने नक्कीच या मागे राजकीय कारण असल्याचे दाट शक्यता वर्तवण्यात येते.
दरम्यान आज सकाळी शरद पवारांनी अजित पवारांचे दोन्ही सुपुत्र पार्थ पवार आणि जय पवार यांच्याशी तब्बल पावणे दोन तास चर्चा केली..
राष्ट्रवादीचे विलीनीकरण होणार का
दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण होणार का? हा महत्त्वाचा विषय आहे. अजित पवारांचीच इच्छा होती कि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावी. त्यादृष्टीने आमच्या काही बैठकही झाल्या असल्याचा दावा शरद पवारांनी केला होता. मात्र दुसरीकडे या बैठका फक्त स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपुरत्या मर्यादित होत्या असं म्हणत अजितदादा गटातील नेते विलीनीकरणाला विरोध करताना दिसत आहेत. सध्या तरी दादा गटाची संपूर्ण सूत्रे हि सुनेत्रा पवार यांच्या हातात आहेत. त्यामुळे आगामी काळात सुनेत्रा पवार नेमकी काय भूमिका घेतात? दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एक होतील का? याकडे उभ्या महाराष्ट्राचे लक्ष्य लागलं आहे.





