राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटेे यांच्या वादग्रस्त वक्तव्याने शेतकऱ्यांमध्ये,शेतकरी संघटनांमध्ये तीव्र संताप आहे. त्यातच, राज्याचं सर्वोच्च सभागृह असलेल्या विधिमंडळात ते चक्क जंगली रम्मी खेळत असल्याचा व्हिडिओ आमदार रोहित पवार यांनी समोर आणला होता. त्यानंतर कोकाटे चांगलेचे अडचणीत आले. परिस्थिती बिकट होत असताना सरकारचा भिकारी असा उल्लेख त्यांनी केला. त्यामुळे कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी आता सर्व स्तरांतून केली जात आहे. याबाबत आता खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाचा प्रमुख या नात्याने स्पष्ट संकेत दिले आहेत.
रम्मीच्या व्हिडिओवर काय म्हणाले दादा?
“माणिकराव कोकाटेंचा वि़डिओ सभागृहाच्या आत घडलं असल्याने तो विधानसभा अध्यक्ष आणि विधानपरिषद सभापतींच्या अखत्यारित येतो. माझी आणि माणिकरावांची प्रत्यक्षात बैठक झाली नाही, त्यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांचं स्पष्टीकरण दिलं आहे. माझी आणि त्यांची बहुतेक सोमवारी बैठक होईल. मला कृषिमंत्री यांच्याशी समोरासमोर बोलायचं आहे. सोमवारी माझी व त्यांची भेट होईल, तेव्हा ते बोलतील.” अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या रम्मीच्या संदर्भातील व्हिडिओवर दिली आहे.
‘सर्वांनी भान ठेवून वागण्याची गरज’
“सरकारला ते भिकारी म्हणाले, याबाबत देखील मी त्यांच्याशी बोलणार आहे. तर, त्यांच्या कृषिमंत्रीपदाच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आम्ही एकत्रित निर्णय घेऊ,” असे अजित पवार यांनी म्हटले. त्यांमुळे वाढत्या दबावामुळे एकतर माणिकराव कोकाटे आता स्वत: राजीनामा देतील किंवा त्यांचा राजीनामा घेतला जाईल अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे.
राजकीय जीवनात आणि प्रमुख पदावर काम करत असताना प्रत्येकाने भान ठेवून वागलं पाहिजे, बोललं पाहिजे, हेच माझं सांगणं आहे. मागे एकदा कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडून असंच घडलं होतं, तेव्हाही मी त्यांना समज दिली होती. इजा झालं, बिजा झालं आता तिसऱ्यांदा अशी वेळ आणू नका असं मी माणिकराव कोकाटेंना सांगितलं आहे. माझी त्यांची आता जेव्हा केव्हा भेट होईल तेव्हा मी काय कारवाई करायची ते बघेन, असे स्पष्ट शब्दात अजित पवारांनी सांगितले.





