Sunetra Pawar In Karad : कराडच्या प्रीतिसंगमवर सुनेत्रा पवार; यशवंतरावांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतलं

Published:
Last Updated:
उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी आपला पहिलाच राजकीय दौरा कराडकडे वळवला. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी जाऊन त्यांनी अभिवादन केले
Sunetra Pawar In Karad : कराडच्या प्रीतिसंगमवर सुनेत्रा पवार; यशवंतरावांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतलं

उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी आपला पहिलाच राजकीय दौरा कराडकडे वळवला. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी जाऊन त्यांनी अभिवादन केले. हा दौरा केवळ श्रद्धांजलीपुरता मर्यादित न राहता, अजित पवारांच्या वैचारिक परंपरेचा पुढचा अध्याय असल्याचे मानले जात आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलणे टाळले- Sunetra Pawar In Karad

आज सकाळी १० वाजता सुनेत्रा पवार यांचे कराड येथील यशवंतराव चव्हाण यांच्या प्रीतिसंगमवर आगमन झाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी खासदार श्रीनिवास पाटील, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री मकरंद पाटील, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, रुपालीताई चाकणकर यांच्यासह पक्षाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. सुनेत्रा पवार यांनी समाधीस्थळी पुष्पांजली अर्पण करत मौन राखले आणि प्रसारमाध्यमांशी बोलणे टाळले.

यानंतर त्या फलटण तालुक्यातील तरडगावकडे रवाना झाल्या. येथे त्यांनी अजित पवार यांचे अंगरक्षक विदीप जाधव यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. बारामती येथे अजित पवार यांच्या विमान अपघातात विदीप जाधव यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतरही मानवी संवेदनशीलता जपत घेतलेली ही भेट विशेष लक्षवेधी ठरली. Sunetra Pawar In Karad

अजित पवार आणि प्रीतिसंगमचे वेगळं नातं

अजित पवार आणि कराडमधील यशवंतराव चव्हाण यांचे प्रीतिसंगम यांचे नाते केवळ राजकीय नव्हते, तर वैचारिक आणि भावनिकही होते. आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या टप्प्यांवर अजित पवार यांनी येथे येऊन अभिवादन केले होते. आपले राजकारण आणि समाजकारण हे यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांवर आधारित असल्याचे ते सातत्याने सांगत. त्यांच्या निधनानंतर आता सुनेत्रा पवारही हाच वैचारिक वारसा पुढे नेत असल्याचे स्पष्ट होत आहे.