राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर संपूर्ण राज्यात शोककळा पसरलेली असताना या दुर्घटनेच्या चौकशीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ठाम भूमिका मांडली आहे. या अपघाताची उच्चस्तरीय चौकशी व्हावी आणि संपूर्ण सत्य जनतेसमोर यावं, अशी स्पष्ट मागणी त्यांनी केली आहे.एका वृत्तवाहिनीशी बोलताना तटकरे यांनी अपघातासंदर्भात अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून यातून निर्माण झालेल्या सर्व शंकांचं निरसन अधिकृत तपासातूनच व्हायला हवं असं तटकरे म्हणाले.
“जिवलग सहकारी म्हणून माझीही ठाम मागणी”
सुनील तटकरे म्हणाले, “अपघाताच्या दिवशीच मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयामार्फत सखोल चौकशी होईल असं स्पष्ट केलं होतं. पहिल्या दोन दिवसांत मी प्रतिक्रिया देण्याच्या मनस्थितीत नव्हतो. मात्र आता पक्षाची आणि माझी वैयक्तिक भूमिका स्पष्ट आहे . या दुर्घटनेची सखोल आणि जलद चौकशी झाली पाहिजे. “राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष आणि अजितदादांचा जिवलग सहकारी म्हणून माझी ठाम मागणी आहे की, संबंधित तपास यंत्रणांनी सत्य बाहेर आणावं. केवळ महाराष्ट्र नव्हे, तर देशाच्या जनतेसमोर वस्तुस्थिती आली पाहिजे.”
ब्लॅक बॉक्समधील नोंदी महत्त्वाच्या
अपघाताच्या कारणांबाबत बोलताना तटकरे यांनी ब्लॅक बॉक्सच्या तपासाला विशेष महत्त्व असल्याचं सांगितलं. “विमान अपघातात ब्लॅक बॉक्स हा अत्यंत निर्णायक पुरावा असतो. शेवटच्या क्षणापर्यंत पायलट काय बोलले, कॉकपीटमध्ये काय घडलं, कोणती तांत्रिक अडचण निर्माण झाली याची सगळी माहिती त्यातून समोर येते. त्यामुळे या तपासाचा अहवाल सार्वजनिक होणं गरजेचं आहे,” असं ते म्हणाले.
“एखाद्या घटनेनंतर शंका उपस्थित होणं स्वाभाविक असतं. पण त्या शंकांचं निरसन अधिकृत तपासातूनच व्हायला हवं. लोकांच्या मनात प्रश्न राहू नयेत. व्यवस्थेनुसार तपास होऊन निष्कर्ष समोर आले पाहिजेत,” अशी भूमिका तटकरेंनी मांडली.






