शिवतीर्थावर शिवसेना उबाठा पक्षाचा मेळावा पार पडला. यावेळी मेळाव्याला संबोधित करताना शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्वांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या. उपस्थितांना संबोधित करताना उध्दव ठाकरेंनी सत्ताधारी पक्ष आणि नेत्यांना लक्ष्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंच्या निशाण्यावर होते. शिवाय ठाकरेंनी राज्यातील पुरस्थिती आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान या मुद्द्याकडे देखील सर्वांचे लक्ष वेधले. शिवाय, राज्यातील शेतकऱ्यांना भरीव मदत करण्यात यावी, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली.
उद्धव ठाकरेंनी शिवतीर्थ मैदान गाजवलं!
राज्यातील पूरस्थिती आणि आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यावर उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या होत्या. या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी भाषण करतना विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. आपल्या भाषणातून उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, “आपल्या परंपरेप्रमाणे सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा… विजयादशमीच्या शुभेच्छा. अशी जीवाला जीव देणारी माणसं हेच आयुष्यातील खरं सोनं असतं. अनेक पक्षांचं आपली शिवसेना फोडण्याकडे लक्ष असतं. त्यांना असं वाटलं काही जणांना त्यांनी पळवलं आहे… पण जे पळवलं ते पितळ होतं खरं सोनं माझ्याकडे आहे.”
यावेळी उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि एकूनच केंद्र सरकारच्या कार्यपद्धतीवर निशाणा साधला. शिवाय महाराष्ट्रातील राज्यसरकारवर देखील उद्धव ठाकरेंनी ताशेरे ओढले. “तुम्ही मुंबई जिंकूच शकू नाही. जिंकली तर अदानीला समर्पित कराल. तुम्ही एक व्यापारी म्हणून मुंबईकडे पाहात आहात. तुम्ही आधी फडक्यावरचा हिरवा काढा, मग आमच्या अंगावर या, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय.
शेतकऱ्यांना मदतीचे सरकारला आवाहन
उद्धव ठाकरे म्हणाले, मी तुम्हाला सर्वांना आवाहन करतोय… हे संकट खूप मोठं आहे. आपल्याकडे सरकार नाहीये पण जे काही करता येईल… फुल नाही पण फुलाची पाकळी… ही मराठवाड्याच्या शेतकऱ्यासाठी देऊ… मोठी बाग नाही पण काहींच्या आयुष्यात एखादं फुल जरी फुलवू शकलो तरी मी म्हणेल आपल्या आयुष्याचं सार्थक झालं. हे करायला पाहिजे.
ज्यावेळी आपलं सरकार होतं तेव्हा मी कोणतेही निकष न लावता शेतकरी कर्जमाफी केली होती. माझं कर्तव्य म्हणून मी तेव्हा केलं होतं. निवडणुकीच्या तोंडावर नाही तर एकमेव माझं अधिवेशन नागपूर येथे झालं होतं तेव्हा मी कर्जमाफी जाहीर केली आणि पूर्ण करुन दाखवली. तशीच कर्जमाफी तुम्ही करुन दाखवा असंही उद्धव ठाकरे म्हणाले.





