ठाकरे बंधू की महायुती कोणाची असेल मुंबई महापालिकेत सरशी?, उद्या ठरणार निकाल

Written by:Smita Gangurde
Published:
बेस्ट कामगार सेना व मनसे बेस्ट कामगार सेनेच्या माध्यमातून दोन्ही ठाकरे बंधू प्रथमच एकत्र आलेत. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झालंय. या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या युतीला यश मिळालं, तर मुंबई महापालिका निवडणुकीत एकत्र येण्यावर अधिकृतरित्या शिक्कामोर्तब होईल.
ठाकरे बंधू की महायुती कोणाची असेल मुंबई महापालिकेत सरशी?, उद्या ठरणार निकाल

मुंबई – मुंबई महापालिकेची लिटमस टेस्ट म्हणून ज्या निवडणुकीकडे पाहिलं जातंय. त्या बेस्ट कामगार पतपेढीच्या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडलं. प्रचंड पाऊस असतानाही या निवडणुकीत ८३ टक्के मतदान झालंय.

या निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेची बेस्ट कामगार सेना आणि मनसेची बेस्ट कामगार सेना एकत्र आलीय.
ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनल विरोधात भाजपकडून 5 संघटनांचं संयुक्त सहकार समृद्धी पॅनल मैदानात उतरलं होतं

निवडणुकीवरुन घमासान

एरवी बेस्टच्या पतपेढीच्या निवडणुकीचा विषय चर्चेचा झाला नसता पण ठाकरे बंधू एकत्र आाल्यानं आणि भाजपानं त्यांना आव्हान दिल्यानं ही निवडणूक गेले काही चुरशीची ठरलीय. पतपेढीच्या संचालकांनी कोट्यवधींचा घोटाळा केल्या आरोप प्रसाद लाड यांनी केल्यानंतर या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखाही सक्रिय झालीय. संचालकांना नोटिसा बजावण्यात आल्यात.

दुसरीकडे या निवडणूकीत मतदारांना पैसे वाटले गेले असा गंभीर आरोप मनसे नेते संदीप देशपांडेंनी केलाय
काही मतदारांना पाकिटातून 1000 रुपये देण्यात आल्याचा आरोप पैसे दाखवत देशपांडेंनी केलाय. तर चायनीज गँग विरुद्ध स्वदेशी गँग अशी ही निवडणूक आहे, स्वदेशी गँग निवडणूक येईल, असं सांगत प्रसाद लाड यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलंय. पराभवाचं खापर फोडण्यासाठी देशपांडे असा आरोप करत असल्याचं भाजपाचं म्हणणंय.

काय आहे निवडणुकीची पार्श्वभूमी

‘दी बेस्ट एम्प्लॉईज को-ऑप. क्रेडिट सोसायटी’च्या 21 जागांसाठी ही निवडणूक झाली. ठाकरेंची शिवसेना 19 तर मनसे 2 जागांवर निवडणूक लढवतंय. त्यामुळं ठाकरेंना टक्कर देण्यासाठी महायुतीच्या 5 संघटना मैदानात उतरल्या होत्या. भाजप आमदार प्रवीण दरेकर आणि आमदार प्रसाद लाड यांची श्रमिक उत्कर्ष सभा, मंत्री नितेश राणे यांची ‘समर्थ बेस्ट कामगार संघटना’ आणि शिंदेंच्या शिवसेनेचे नेते किरण पावसकर यांची ‘राष्ट्रीय कर्मचारी सेना’ एकत्र येत ‘सहकार समृद्धी पॅनल’ची निर्मिती केली

दरम्यान, निवडणुकीच्या 24 तास आधीच क्रेडिट सोसायटीला आर्थिक गुन्हे शाखेकडून 21 संचालकांना नोटीस देण्यात आली. 24 कोटी रुपयांच्या कथित गैरव्यवहाराबाबत चौकशी सुरू करण्यात आली आहे
त्यामुळं हा योगायोग आहे की आणखी काही हा प्रश्न उपस्थित होतोय

बेस्ट कामगार सेना व मनसे बेस्ट कामगार सेनेच्या माध्यमातून दोन्ही ठाकरे बंधू प्रथमच एकत्र आलेत. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झालंय. या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या युतीला यश मिळालं, तर मुंबई महापालिका निवडणुकीत एकत्र येण्यावर अधिकृतरित्या शिक्कामोर्तब होईल. त्यामुळे महायुती विरुद्ध ठाकरे बंधू यांच्यात कोण बाजी मारणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय. अवघ्या काही तासांत या प्रश्नाचं उत्तर मतमोजणीतून मिळणार आहे.