हडपसरमध्ये उभे राहणार अत्याधुनिक बुलेट ट्रेन स्थानक

Published:
हडपसर परिसरात बुलेट ट्रेनचे अत्याधुनिक स्थानक उभारण्याचा प्रस्ताव आता अधिक स्पष्ट होत असून, पुणेकरांसाठी हा प्रकल्प मोठी पायाभूत सुविधा बदल घडवणारा ठरणार आहे. मुं
हडपसरमध्ये उभे राहणार अत्याधुनिक बुलेट ट्रेन स्थानक

हडपसर परिसरात बुलेट ट्रेनचे अत्याधुनिक स्थानक उभारण्याचा प्रस्ताव आता अधिक स्पष्ट होत असून, पुणेकरांसाठी हा प्रकल्प मोठी पायाभूत सुविधा बदल घडवणारा ठरणार आहे. मुंबई–पुणे आणि पुणे–हैदराबाद या जलदगती मार्गांचा दुहेरी प्रकल्प हाती घेण्यात आला असून, दोन्ही मार्ग एकाच वेळी विकसित करण्याची तयारी सुरू आहे. या संपूर्ण प्रकल्पाचा केंद्रबिंदू म्हणून हडपसरची निवड करण्यात आली आहे.

पुण्यातील मध्यवर्ती भागात बुलेट ट्रेन स्थानकासाठी आवश्यक तेवढी मोकळी जागा उपलब्ध नसल्याने आणि भूसंपादनाचा खर्च अवाजवी वाढण्याची शक्यता असल्याने पर्याय शोधला जात होता. हडपसर हा तुलनेने विस्तृत आणि जोडणीच्या दृष्टीने सोयीचा भाग असल्याने त्याची निवड झाली. येथे पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्ग, मेट्रो मार्ग, तसेच भविष्यातील हैदराबादकडे जाणाऱ्या बुलेट ट्रेन मार्गाची उत्तम सांगड बसणार आहे. शहराच्या पूर्वेला असलेला हा भाग वाहतुकीच्या दृष्टीने इतर क्षेत्रांपेक्षा कमी कोंडीयुक्त असल्याचा विचारही तज्ज्ञांनी मांडला आहे.

किती खर्च होणार

स्थानक उभारणीसाठी अंदाजे चार हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. बुलेट ट्रेन ताशी 350 किलोमीटर वेगाने धावणार असल्याने स्थानकाची रचना पूर्णपणे वेगळी असेल. ट्रेन धावताना निर्माण होणाऱ्या हवेच्या दाबामुळे संरचनांवर ताण येऊ नये म्हणून विशेष तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येईल. यासाठी अत्याधुनिक एरोडायनॅमिक डिझाइनचा अवलंब केला जाणार आहे.

मुंबई–पुणे मार्गावर घाट विभागात सुमारे 45 किलोमीटर अंतरावर बोगदे आणि उंच पुलांची आवश्यकता भासणार आहे. यामुळे लोणावळ्यात स्थानक करणे शक्य नसल्याने त्यासाठी कामशेत हा पर्याय निवडण्यात आला आहे. तसेच पुण्याच्या आयटी पट्ट्यात असलेल्या हिंजवडीमध्येही स्वतंत्र स्थानकाची योजना करण्यात आली आहे. बुलेट ट्रेनचा ट्रॅक उभारण्यासाठी प्रति किलोमीटर अंदाजे 250 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. काही ठिकाणी हा उन्नत मार्ग सात मीटर, तर काही ठिकाणी दहा मीटर उंचीवर असणार आहे. मुंबई–पुणे आणि पुणे–हैदराबाद या दोन्ही मार्गांसाठी मिळून सुमारे दोन लाख कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. प्रकल्पाचा सविस्तर अहवाल रेल्वे बोर्डाकडे 2021-22 मध्ये सादर झाला असून आता मार्ग मंजुरीनंतर फक्त अवलोकनाची प्रक्रिया करावी लागणार आहे.

कधी सुरू होणार बुलेट ट्रेन

निधी उपलब्ध होताच या दोन्ही मार्गांवर एकाच वेळी कामाला सुरुवात करण्यात येईल. काम सुरू झाल्यानंतर पाच ते सात वर्षांत बुलेट ट्रेन सेवा प्रत्यक्षात सुरु होऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. देशाच्या पहिल्या टप्प्यातील जलदगती रेल्वे नेटवर्कमध्ये मुंबई–पुणे–हैदराबाद मार्गाला प्राधान्य देण्यात आले असून जवळपास 4000 किलोमीटर अंतरावर बुलेट ट्रेन धावण्याचा आराखडा तयार आहे. पुढील टप्प्यात हा विस्तार सुमारे 7000 किलोमीटरपर्यंत नेण्याचे नियोजन सरकारने केले आहे. या प्रस्तावामुळे हडपसर परिसराचा विकास वेगाने होण्याची शक्यता असून, पूर्व पुणे भविष्यातील प्रमुख वाहतूक केंद्र म्हणून उदयास येईल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews