Pune News: पुणे जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या नगरपरिषदांसाठी उद्या म्हणजेच 20 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर ज्या ज्या ठिकाणी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूका आहेत, त्या त्या ठिकाणी उद्या २० डिसेंबर २०२५ रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे. मतदानाच्या दिवशी नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये आणि मतदानाची टक्केवारी वाढावी, हा हेतू डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेण्यात आला आहे
कोणकोणत्या भागातील नागरिकांना सुट्टी (Pune News)
सामान्य प्रशासन विभागाच्या अधिसूचनेनुसार जिल्ह्यातील बारामती, दौंड, फुरसुंगी-उरुळी देवाची, लोणावळा आणि तळेगाव दाभाडे या नगरपरिषदेच्या मतदार संघात सुट्टी असणार आहे. सर्व विभागानी त्यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे/मंडळे आदींच्या निदर्शनास आणून द्यावी.
दूरच्या मतदारांना फायदा होणार
मतदारसंघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामाकरिता त्या त्या मतदारसंघाच्या बाहेर असणाऱ्यांना मतदारांना देखील लागू राहणार आहे. केंद्र शासनाच्या शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका आदींना सार्वजनिक सुट्टी लागू राहील, येत्या २० डिसेंबर २०२५ रोजी मतदारांनी न चुकता मतदान करावे, असे आवाहन जितेंद्र डुडी यांनी केले आहे. या निर्णयाचा फायदा फक्त स्थानिक कर्मचाऱ्यांनाच नाही, तर जे मतदार या मतदारसंघातील रहिवासी आहेत मात्र कामानिमित्त मतदारसंघाच्या बाहेर जातात, त्यांनाही याचा फायदा होताना दिसेल.





