बॉलिवूडचा एनर्जी पॅकेज म्हणून ओळखला जाणारा रणवीर सिंह सध्या आपल्या जबरदस्त हिट ठरलेल्या ‘धुरंधर’मुळे प्रकाशझोतात आहे. 2025 हे वर्ष रणवीरसाठी ऐतिहासिक ठरत आहे. कारण अवघ्या 19 दिवसांत ‘धुरंधर’ने सुमारे 900 कोटींची तुफानी कमाई करत बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज विक्रम रचला आहे. प्रेक्षकांनी त्याच्या अभिनयाला दिलेली दाद आणि चित्रपटाने मिळवलेले यश पाहता रणवीरची लोकप्रियता पुन्हा एकदा शिखरावर पोहोचली आहे.
या सगळ्या गदारोळात नुकतीच अशी बातमी समोर आली आहे की रणवीर सिंहने सुपरहिट फ्रँचायझी ‘डॉन 3’मधून स्वतःला दूर केले आहे. यामुळे अनेक चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे की अखेर इतक्या मोठ्या ब्रँडचा भाग होण्यास रणवीरने नकार का दिला?
फरहान अख्तरची दिग्दर्शनात पुन्हा एन्ट्री (Ranveer Singh Don 3)
‘डॉन’ मालिकेचे दोन्ही भाग प्रेक्षकांनी खुले मनाने स्वीकारले आहेत. 2023 मध्ये ‘डॉन 3’ची घोषणा होताच या चित्रपटाची प्रचंड चर्चा सुरु झाली होती. फरहान अख्तर पुन्हा एकदा दिग्दर्शकाच्या भूमिकेत परतणार असल्याने चाहत्यांमध्ये उत्सुकता अधिकच वाढली होती. मात्र, आधी अभिनेत्री कियारा अडवाणीने प्रोजेक्टमधून माघार घेतली आणि आता रणवीरनेही चित्रपट नाकारल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
रणवीरचा नकार – ‘धुरंधर’च्या यशाचा प्रभाव?
चित्रपटसृष्टीतील चर्चेनुसार, रणवीरने ‘धुरंधर’मध्ये एक ताकदीचा, प्रभावी आणि स्टाईलिश गॅंगस्टर साकारला. हा रोल इतका चर्चेत आला आहे की त्यानंतर लगेचच आणखी एका गॅंगस्टर-केंद्रित प्रोजेक्टमध्ये काम करण्यापासून रणवीर दूर राहू इच्छित आहे. ‘धुरंधर’ने त्याच्या करिअरला दिलेल्या गतीमुळे तो आता विविध शैलींमध्ये स्वतःला आजमावण्यास इच्छुक असल्याचे म्हटले जाते.
सूत्रांनुसार, रणवीरला आपल्या भूमिकांमध्ये वैविध्य टिकवून ठेवायचे आहे. ‘डॉन 3’ त्याच्यासाठी मोठा प्रोजेक्ट असला तरी, सलग समान प्रकारच्या भूमिकांमध्ये दिसल्यास प्रेक्षकांवर त्याचा परिणाम होईल असे त्याला वाटत असल्यानेच त्याने हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.
प्रलय’वर रणवीरचा पूर्ण फोकस
‘धुरंधर’नंतर रणवीर सिंहची पुढील मोठी फिल्म म्हणजे जय मेहता दिग्दर्शित ‘प्रलय’. या चित्रपटात रणवीर एका भक्कम आणि वेगळ्या भूमिकेत दिसणार असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे पुढील काही महिन्यांत त्याचा पूर्ण फोकस ‘प्रलय’वर असणार आहे.
या सर्व चर्चांवर रणवीर किंवा त्याच्या टीमकडून अद्याप कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही. पण ‘डॉन 3’सारख्या मोठ्या फ्रँचायझीमधून त्याची एक्झिट हा सध्या बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला आहे.





