अजितदादांच्या निधनानंतर अभिनेता रितेश देशमुखांची भावुक प्रतिक्रिया चर्चेत

Published:
रितेश देशमुख यांनी अजित पवार यांच्या काही जुन्या छायाचित्रांसह ट्विटरवर लिहिले की, “अजितदादांच्या निधनाची बातमी ऐकून मी हादरलो आहे. महाराष्ट्राने एक डायनॅमिक नेता गमावला आहे.
अजितदादांच्या निधनानंतर अभिनेता रितेश देशमुखांची भावुक प्रतिक्रिया चर्चेत

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनाने संपूर्ण राज्य हादरले आहे. बारामती परिसरात लँडिंगदरम्यान झालेल्या या भीषण दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह विमानातील इतर पाच जणांचा मृत्यू झाला. अचानक आलेल्या या काळजाला पिळवटून टाकणाऱ्या बातमीने राजकीय वर्तुळासोबतच कला क्षेत्रही तितक्याच वेदनेने व्याकूळ झाले आहे. या दुर्घटनेने देशभरातून श्रद्धांजलीचा ओघ सुरू झाला असताना, बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख यांचा भावनिक ट्वीट विशेष चर्चेत आला आहे. अजित पवार यांच्याशी घरच्यांचे नाते जपणाऱ्या रितेश यांनी त्यांच्या आठवणी मनापासून व्यक्त केल्या.

काय म्हणाला रितेश देशमुख

रितेश देशमुख यांनी अजित पवार यांच्या काही जुन्या छायाचित्रांसह ट्विटरवर लिहिले की, “अजितदादांच्या निधनाची बातमी ऐकून मी हादरलो आहे. महाराष्ट्राने एक डायनॅमिक नेता गमावला आहे. कमी परफॉर्मन्स अजिबात न चालवून घेणारे, आपल्या आसपासच्या लोकांना सतत उत्तम कामगिरीसाठी प्रेरणा देणारे असे ते व्यक्तिमत्व होते. त्यांची हजरजबाबी शैली, थेट संवाद आणि लोकांमधील लोकप्रियता… हे सगळं त्यांना वेगळं बनवत होतं. त्यांचे अचानक जाणे ही अशी पोकळी आहे जी कधीच भरून निघणार नाही.”

एका छायाचित्रात अजित पवार हे रितेश देशमुख यांचे वडील, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना मिठी मारताना दिसत आहेत. हे चित्र दोन्ही कुटुंबांमधील जिव्हाळ्याच्या नात्याची साक्ष देणारे. रितेश म्हणतात, “माझे त्यांच्याशी अनेकदा संवाद झाले आणि प्रत्येक वेळी त्यांची उदारता, मनमोकळा स्वभाव आणि बोलण्यातली पर्वा न करणारी प्रामाणिकता जाणवली. पवार कुटुंबियांना, त्यांच्या प्रियजनांना आणि लाखो समर्थकांना माझ्या मनापासून संवेदना.”

अनुपम खेर यांनीही शोक व्यक्त केला.

रितेशनंतर अनुभवी अभिनेता अनुपम खेर यांनीही शोक व्यक्त केला. “अजित पवार दादांच्या अकस्मात निधनाने मी स्तब्ध आहे. जेव्हा जेव्हा भेटलो तेव्हा ते अत्यंत नम्र, संयमी आणि मनमिळाऊ होते. या कठीण काळात माझ्या संवेदना त्यांच्या कुटुंबासोबत आहेत,” असे खेर यांनी लिहिले. अजित पवार यांच्या अकस्मात गेल्याने राज्यात निर्माण झालेलं शून्य किती व्यापक आहे, हे राजकीय क्षेत्रासह कला-सांस्कृतिक क्षेत्रातील प्रतिक्रिया स्पष्टपणे सांगत आहेत. राज्यातील जनमानसात लोकप्रिय असणारा नेता एका क्षणात काळाच्या पडद्याआड गेला ही वेदना अनेकांच्या मनातून सहज पुसली जाणार नाही.