Praful Patel NCP Chief : राजकीय विश्वातून मोठी घडामोड समोर आली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर खासदार प्रफुल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आल्याची माहिती भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी दिली आहे. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा खुलासा केला.
यावेळी बोलताना पियुष गोयल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे विलीनीकरण होण्याची शक्यता फेटाळून लावली. “अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महायुती सरकारमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतील, असे मला वाटत नाही,” असे गोयल म्हणाले. ते पुढे म्हणाले की, “राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व आधी अजित पवार यांच्याकडे होते. सध्या सुनेत्रा पवार यांच्याकडे पक्षाची विधिमंडळ पातळीवरील जबाबदारी आहे, तर राष्ट्रीय स्तरावर पक्षाचे नेतृत्व प्रफुल पटेल यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.”
तर्क-वितर्कांना पूर्णविराम (Praful Patel NCP Chief)
अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबत राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या होत्या. कालच अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदीही त्यांची निवड झाली. यामुळे सुनेत्रा पवार यांचीच राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड होईल, किंवा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण होऊन पुन्हा एकदा शरद पवार यांच्याकडे पक्षाची सूत्रे जातील, अशा शक्यता व्यक्त केल्या जात होत्या. मात्र पियुष गोयल यांच्या वक्तव्यामुळे या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाल्याचे मानले जात आहे. Praful Patel NCP Chief
राज ठाकरे यांचे विधान आणि त्यानंतरची खळबळ
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य अध्यक्षपदावर कालच परखड मत व्यक्त केले होते. “महाराष्ट्राच्या राजकारणाचा सध्या पुरता विचका झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेससारखा अस्सल मराठमोळ्या मातीतला पक्ष असून त्याचा अध्यक्ष मराठी असावा, पाटील असावा; पण पटेल नसावा,” असे विधान राज ठाकरे यांनी केले होते. या वक्तव्यानंतर अवघ्या काही तासांतच प्रफुल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याची माहिती समोर आल्याने राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, या नियुक्तीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.





