बॉलीवूड अभिनेता वरुण धवन आपल्या नव्या व्हिडिओमुळे मोठ्या वादात अडकला आहे. नुकताच त्याने इन्स्टा स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यात तो मुंबई मेट्रोमध्ये पुलअप्स करताना दिसत होता. जरी हा व्हिडिओ त्याच्या फिल्म ‘बॉर्डर 2’ च्या प्रमोशन स्ट्रॅटेजीचा भाग होता, तरी या कृतीमुळे अधिकृत मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड (MMMOCL) ने थेट इशारा देत वरुणला सुनावले आहे.
MMMOCL ने स्पष्ट शब्दांत सांगितले की, मेट्रोसारख्या सार्वजनिक वाहतुकीत अशा स्टंट्सना अजिबात परवानगी नसते आणि असे प्रकार 2002 च्या नियमांनुसार दंड किंवा गंभीर परिस्थितीत तुरुंगवासालाही कारणीभूत ठरू शकतात. त्यांच्या पोस्टमध्ये वरुण धवनचे नाव घेऊन चेतावणी देण्यात आली आहे—“मेट्रोमध्ये असे स्टंट करू नयेत. मेट्रोतील ग्रॅब हँडल्स लटकण्यासाठी नसतात.”
व्हिडिओ आला अंगलट
हा व्हिडिओ वरुणने ‘बॉर्डर 2’ पाहण्यासाठी मेट्रोने प्रवास करतानाच शूट केला होता. त्यात तो प्रवाशांशी गप्पा मारताना आणि पुलअप्स करताना दिसला. त्याने फॅन्सना अंदाज बांधायला सांगितले की, तो कोणत्या थिएटरकडे निघाला आहे. मात्र काही क्षणांच्या मजेसाठी केलेली ही कृती आता त्याच्यासाठी विपरीत ठरली आहे.
MMMOCL ने या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना नमूद केले की, अशा कंटेंटसोबत डिस्क्लेमर असणे आवश्यक आहे, अगदी चित्रपटांमध्ये दाखवल्याप्रमाणे. “मित्रांसोबत मेट्रोमध्ये हँगआऊट करण्यास हरकत नाही, पण सुरक्षेचे नियम पाळणे तितकेच महत्वाचे आहे,” असा सल्लाही त्यांनी दिला.
सोशल मीडियावर चर्चांना वेग
दरम्यान, सोशल मीडियावर या व्हिडिओवर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. एका युजरने लिहिले, “पब्लिक ट्रान्सपोर्टचा आदर केला पाहिजे, हे योग्य लक्षात आणून दिलंत.” तर दुसरा म्हणाला, “जागरूकतेसाठी महत्त्वाची पोस्ट.” काहींनी तर थेट कारवाई करण्याची मागणी केली, तर काहींनी खिल्ली उडवत म्हटले—“वरुणने स्वतःचीच बेइज्जती करून घेतली.”
वरुणच्या या कृतीतून एक गोष्ट स्पष्ट झाली—सेलेब्रिटी असो वा सामान्य प्रवासी, मेट्रोमध्ये नियम पाळणे सर्वांसाठीच बंधनकारक आहे. सुरक्षिततेला धक्का पोचवणाऱ्या कोणत्याही गोष्टीवर मुंबई मेट्रोची नजर चुकत नाही.





