मुंबईवरून विदर्भात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. सध्याच्या सणासुदीच्या काळात प्रवाशांचा प्रवास सोपा, सुखकर आणि आरामदायी व्हावा यासाठी मध्य रेल्वेने मुंबई ते नागपूर या विशेष ट्रेनची ( Mumbai Nagpur Special Train) घोषणा केली आहे. येत्या २५ सप्टेंबरपासून ही रेल्वे ट्रॅक वर धावणार आहे. नवरात्री, दसरा, दिवाळी या सणांच्या पार्श्वभूमीवर होणारी वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
कसा असेल रूट – Mumbai Nagpur Special Train
ट्रेन क्रमांक ०२१३९ हि २५ सप्टेंबर ते २७ नोव्हेंबर या कालावधीत दर गुरुवारी लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) वरून नागपूरसाठी धावेल. ही दिवाळी स्पेशल रेल्वे दर गुरुवारी मुंबईवरून मध्यरात्री 12 वाजून 15 मिनिटांनी सुटेल आणि दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी नागपूरला पोहचेल. तर परतीच्या प्रवासात ट्रेन क्रमांक ०२१४० 26 सप्टेंबर ते 28 नोव्हेंबर या कालावधीत दर शुक्रवारी नागपूरहून दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी मुंबईच्या दिशेने रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 4 वाजून 10 मिनिटांनी मुंबईत दाखल होईल (Mumbai To Nagpur Special Train)
कोणकोणत्या स्थानकांवर थांबे मिळणार??
मुंबई ते नागपूर स्पेशल ट्रेन तिच्या प्रवासादरम्यान, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा या रेल्वे स्थानकांवर थांबेल. हि स्पेशल ट्रेन ३ एसी ३-टायर, १० स्लीपर, ५ जनरल सेकंड क्लास, २ सेकंड सीटिंग आणि गार्ड-ब्रेक व्हॅनसह असेल.
पुणे नागपूर ट्रेनही धावणार –
मुंबईशिवाय मध्य रेल्वे सणासुदीच्या काळात पुणे ते नागपूर अशी रेल्वेही सुरु करणार आहे. पुणे – नागपूर विशेष रेल्वेगाडी 27 सप्टेंबरपासून (Pune Nagpur Special Train) सुरु होणार आहे. ही स्पेशल गाडी 30 नोव्हेंबर पर्यंत धावेल. ०१२०९ नागपूर -पुणे- नागपूर साप्ताहिक विशेष (२० फेऱ्या) रेल्वे गाडी २७ सप्टेंबर ते २९ नोव्हेंबर या कालावधीत प्रत्येक शनिवारी नागपूर येथून १९.४० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी ११.२५ वाजता पोहोचेल. तर ०१२१० नागपूर- पुणे- नागपूर विशेष (१० सेवा) रेल्वे गाडी २८ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत प्रत्येक रविवारी पुणे येथून १५.५० वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी ०६.३० वाजता पोहोचेल.





