मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सुरू असलेल्या महिलांच्या ई-केवायसी प्रक्रियेला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. ई-केवायसी करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर आहे. याबाबत कोणतीही मुदतवाढ आतापर्यंत घोषित करण्यात आलेली नाही. त्यामुळे ज्या महिला eKYC पूर्ण करणार नाहीत, त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई केली जाण्याची दाट शक्यता आता निर्माण झाली आहे. त्यामुळे एकीकडे निवडणूक आचारसंहितेमुळे महिलांना हप्त्याचे पैसे वेळेवर मिळत नाहीत, तर दुसरीकडे लाखो महिला या योजनेतून बाहेर काढल्या जाण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे.
40 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरणार ?
या योजनेचा सध्या राज्यातील 2 कोटी 47 लाख महिलांना लाभ मिळत आहे. मात्र, त्यापैकी केवळ सुमारे 1 कोटी 60 लाखांच्या आसपास महिलांनीच ई-केवायसी पूर्ण केली आहे. उर्वरित 40 लाखांहून अधिक लाभार्थ्यांनी ही प्रक्रिया अद्याप पूर्ण न केल्याने त्यांच्यावर अपात्रतेचा धोका निर्माण झाला आहे. यात ग्रामीण व शहरी भागातील अनेक लाभार्थी महिलांचा समावेश आहे. राज्य सरकारने ई-केवायसीसाठी 31 डिसेंबरपर्यंत अंतिम मुदत दिली होती. ही मुदत संपल्यानंतर अपूर्ण ई-केवायसी असलेल्या लाभार्थ्यांबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी माहिती राज्य महिला व बालविकास विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
खरंतर महायुती सरकारसाठी महत्त्वाची आणि निवडणुकीत ‘गेमचेंजर’ ठरलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सध्या निर्णायक टप्प्यावर आली आहे. या योजनेतील 40 लाखांहून अधिक महिला लाभार्थ्यांवर अपात्र ठरण्याची टांगती तलवार आहे. कारण मोठ्या संख्येने लाभार्थ्यांनी अद्याप ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. पात्रतेची पडताळणी करण्यासाठी राज्य सरकारने ई-केवायसी बंधनकारक केली असून, मुदत संपल्यानंतर अपूर्ण प्रकरणांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.
e-KYC / दुरूस्तीसाठी 31 डिसेंबरची मुदत
ई-केवायसी करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर आहे. आतापर्यंत अनेक महिलांनी आपली ई-केवायसी पूर्ण केली आहे. मात्र, ई-केवायसी करताना काहींनी चुकीची माहिती भरल्याने त्यात दुरुस्तीची आवश्यकता आहे. तुम्हाला सुद्धा केवायसीमध्ये दुरुस्ती करायची असेल तर काळजी करू नका. कारण, तुम्हाला केवायसीमध्ये दुरुस्ती करण्याची एक शेवटची संधी उपलब्ध झाली आहे. या संदर्भात मंत्री अदिती तटकरे यांनी एक्सवर पोस्ट करुन माहिती दिली आहे.
मंत्री अदिती तटकरे यांनी म्हटलं, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील बहुतांश लाभार्थी या दुर्गम, ग्रामीण भागातील आहेत. e-KYC प्रक्रिया करत असताना त्यांच्याकडून काही चूक होणे स्वाभाविक आहे. या चुका दुरुस्त करण्याची संधी मिळावी अशा आशयाची अनेक निवेदने विभागास प्राप्त झाली आहेत. सदर योजना ही महिला सक्षमीकरणाच्या हेतूने राबविण्यात येत आहे, म्हणूनच या महिलांना e-KYC करताना झालेली चूक सुधारण्याची संधी देणे अत्यंत गरजेचे आहे. हीच बाब लक्षात घेऊन e-KYC मध्ये केवळ एकदाच सुधारणा करण्याची अंतिम संधी 31 डिसेंबर 2025 पर्यंत देण्यात येत आहे असंही मंत्री अदिती तटकरे यांनी म्हटलं आहे.
बहिणींनो, ई-केवायसी पूर्ण करून घ्या!
योजनेतील महिला लाभार्थ्यांसाठी आता एक मोठा बदल करण्यात आला आहे. केवळ लाभार्थी महिलेचेच नाही, तर त्या महिलेचे पती किंवा वडिलांचे ई-केवायसी (e-KYC) करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या नव्या नियमानुसार, सरकार आता लाभार्थी महिलेच्या उत्पन्नासोबतच तिच्या कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न पडताळून पाहणार आहे.
- लाभार्थी महिलांना https://ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत वेब पोर्टलवर जाऊन ई-केवायसी करायची आहे.
- संपूर्ण प्रक्रियेमध्ये तुम्हाला तुमची काही महत्त्वाची कागदपत्रे आणि माहिती पुन्हा अपलोड करावी लागेल.
- तुमचे नाव, पत्ता, शिधापत्रिका (रेशन कार्ड) क्रमांक, उत्पन्नाची माहिती आणि आधार कार्डची माहिती यांचा समावेश असेल. प्रोसेस पूर्ण होईल.
यामध्ये विवाहीत महिलांना आपल्या पतीची आणि मुलींना आपल्या वडिलांची ई-केवायसी देखील करून घ्यावी लागणार आहे. निर्धारीत मुदतीमध्ये प्रक्रिया पार पाडावी लागेल.





